भोसरी-आळंदी रस्त्यावरील वाहतूक कोंडी काही कमी होईना !

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 December 2020

  • भोसरीतील मुख्य बाजारपेठ असल्याने वाहनांची वर्दळ; पदपथावर अतिक्रमण 

भोसरी : "भोसरीतील आळंदी रस्त्यावर संध्याकाळी वाहनांची प्रचंड गर्दी होत असते. बनाचा ओढा ते भोसरी-आळंदी रस्ता चौकापर्यंत सुमारे एक किलोमीटरच्या अंतरासाठी सुमारे अर्धा तास वेळ लागतो. या रस्त्यावर ठिकठिकाणी हातगाडीवाले आहेत. त्याचप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा वाहनेही लावली जातात. पादचारीही रस्त्यावर असल्याने वाहनांची कोंडी होते. हे नित्याचेच असल्याने या रस्त्याने प्रवास करणे शक्‍य असल्यास टाळतो,'' असे वाहनचालक चंद्रकांत रासकर सांगत होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

भोसरीतील आळंदी रस्त्यावर सम-विषम पार्किंगचे नियोजन आहे. मात्र, या ठिकाणी दररोज रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावली जातात. रस्त्याच्या कडेला हातगाडीवाले आणि पथारीवाले ठाण मांडून बसलेले असतात. आळंदी रस्त्यावर भोसरीतील मुख्य बाजारपेठ असल्याने या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. येथील पदपथही अरुंद असून, काही ठिकाणी दुकानदारांनी विक्रीच्या वस्तू पदपथावर ठेवल्या आहेत. त्यामुळे ग्राहक आणि नागरिकांना मुख्य रस्त्यावरून चालावे लागते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आळंदी रस्त्याने दिघी, चऱ्होली, आळंदी, चाकण, विश्रांतवाडी, येरवडा, पुणे आदी भागांकडे जाण्यासाठी त्याचप्रमाणे या भागातून भोसरी, भोसरी एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड शहरात येण्यासाठी या रस्त्याचा उपयोग केला जातो. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. संध्याकाळी तर अक्षरशः वाहनचालकांना कोंडीचा सामना करावा लागतो. आळंदी रस्त्यावरील कोंडीचा परिणाम पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावरही होतो. भोसरी-आळंदी रस्ता चौकात आळंदी रस्त्याने वळणाऱ्या वाहनांची कोंडी या चौकात झालेली असते. त्यामुळे या सेवा रस्त्यावर कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह चौक ते चांदणी चौकापर्यंतच्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. 

अर्बन सिटीमुळे वाहतूक कोंडी? 

महापालिकेच्या बीआरटीएस विभागाद्वारे भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली अर्बन सिटीचे काम सुरू आहे. या कामाअंतर्गत उड्डाणपुलाखालील दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्याचे दुपदरीकरण करण्यात येणार आहे. तसेच, उर्वरित रस्त्यावर अर्बन सिटी प्रकल्पाअंतर्गत इतर सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात येतील. मात्र, सध्या तीन-चार पदरी सेवा रस्ता असताना वाहतूक कोंडी होत आहे. अर्बन सिटीच्या उभारणीनंतर दोन पदरी रस्त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडेल, अशी शक्‍यता आहे. 

कोंडी टाळण्यासाठी 

  • आळंदी रस्त्यावर सम-विषम पार्किंगचे नियम मोडणाऱ्यांवर वाहनचालकांवर कारवाई करणे 
  • रस्त्याच्या कडेला असणाऱ्या हातगाडी, पथारीवाल्यांना हटविणे 
  • पादचाऱ्यांसाठी पदपथ मोकळा करणे 
  • भोसरी-दिघी रस्ता चौक, चांदणी चौक येथे संध्याकाळी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करणे 
  • पीएमटी चौक, भोसरी-आळंदी रस्ता चौक व चांदणी चौकात पार्किंग करणाऱ्यांवर कारवाईची गरज 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भोसरी-आळंदी रस्ता चौकात रिक्षासह इतर खासगी प्रवासी वाहने थांबविली जातात. त्यामुळे या रस्त्यावरून वळणाऱ्या वाहनांना आणि मोशीकडे जाणाऱ्या वाहनांना अडथळा होतो. त्यामुळे वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई होणे गरजेचे आहे. 
- अमोल सातखांबे, वाहनचालक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: traffic jam on bhosari alandi road