Pimpri : निलंबनाच्या निर्णयामुळे हादरलो ; एसटी कर्मचाऱ्याची व्यथा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

st bus

निलंबनाच्या निर्णयामुळे हादरलो ; एसटी कर्मचाऱ्याची व्यथा

पिंपरी : एसटीतील प्रवासी भरल्यानंतर मी उस्मानाबादला गाडी भरून आलो. अचानक दुसऱ्या दिवशी संप लागला. संपामुळे मला मूळ ठिकाणी परतता आले नाही. गाड्यांची तोडफोड होण्याची भीती होती. तसे झाले असता पदरचे पैसे भरावे लागले असते. त्यात एसटी प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली. मला थांगपत्तादेखील नाही. डेपोतून फोन आले तेव्हा समजले. घरात सहा माणसाचं कुटुंब आहे. शेत आहे, पण त्यात काही पिकत नाही. या निर्णयामुळे माझे सर्व कुटुंबीय हादरुन गेले आहे, अशी व्यथा निलंबित केलेल्या एका कर्मचाऱ्याने मांडली.

निलंबित केलेले सहा कर्मचारी संपाच्या आधी एक दिवस उस्मानबादमधील उमरगा या ठिकाणी प्रवाशांना घेऊन गेले. निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये चालक व वाहक यांचा समावेश आहे. प्रत्येक जण गरीब कुटुंबातील आहे. अडीचशे किलोमीटरवरून गाव सोडून वल्लभनगर आगारात कामासाठी आलेले आहेत. जेमतेम पगारात कुटुंब चालविणारे चालक-वाहक या निर्णयामुळे हवालदिल झाले आहेत. परंतु, संपात सहभागी असलेल्या सर्वांनी त्यांना दिलासा दिला आहे. नोकरीवर पुन्हा न घेतल्यास कसं जगायचं असा एकच प्रश्न निलंबित कर्मचाऱ्यांना सतावीत आहे. जोपर्यंत निलंबित कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा रुजू करुन घेत नाही, तोपर्यंत संप सुरुच राहणार असल्याचे वल्लभनगर डेपोतील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

एसटी वल्लभनगर आगार प्रशासनाने निलंबनाचे आदेश काढल्यानंतर कर्मचाऱ्यांशी संपर्क केलेला नाही. केवळ नोटीस फलकावर आदेश लावून ठेवले आहेत. त्यामुळे सूडबुद्धीने केलेली कारवाई असल्याने गळचेपी झाली आहे. उस्मानाबाद आगारातून एसटी बाहेर काढता येत नसल्याने या कर्मचाऱ्यांचीदेखील गोची झाली आहे. इकडे आड तिकडे विहीर असे दुखणे झाले आहे. परंतु, निलंबित कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्याची इच्छा असल्याचे सांगितले. परंतु, डेपोतील काही जण दबावतंत्र वापरत असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

दोघा भावांमध्ये दोन एकर जमीन आहे. ती कित्येक वर्षांपासून पिकत नाही. माझ्या भावाला कामावर जायचं आहे; पण संपामुळे माझ्या भावाला रुजू होता येत नाही. तो पूर्णपणे घाबरला आहे. नोकरीशिवाय आम्हाला पर्याय नाही. आमचं पुढे कसं होणार, कारवाई पाठीमागे घेतील का, याची टांगती तलवार आहे.

- निलंबित कर्मचाऱ्याचा भाऊ, उस्मानाबाद

loading image
go to top