esakal | 'पालखीचा भोई होण्याचे भाग्य लाभल्याने जीवनाचे सार्थक झाले'
sakal

बोलून बातमी शोधा

tukoba.jpg

कोरोनामुळे यंदा चक्क जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या पालखीचा भोई होण्याचे भाग्य लाभले. जीवनाचे सार्थक झाले, अशी भावना श्री क्षेत्र देहू ते पंढरपूरला तुकाराम महाराजांची पालखी घेऊन गेलेले एसटी बसरुपी रथाचे चालक शहाजी कल्याण खोटे यांनी व्यक्त केली.

'पालखीचा भोई होण्याचे भाग्य लाभल्याने जीवनाचे सार्थक झाले'

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

तळेगाव स्टेशन : आजपर्यंत दर आषाढीला वारीत गेलेल्या वारक-यांना स्वगृही परत आणण्यासाठी पंढरपूरला जायचो. मात्र,कोरोनामुळे यंदा चक्क जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या पालखीचा भोई होण्याचे भाग्य लाभले. जीवनाचे सार्थक झाले, अशी भावना श्री क्षेत्र देहू ते पंढरपूरला तुकाराम महाराजांची पालखी घेऊन गेलेले एसटी बसरुपी रथाचे चालक शहाजी कल्याण खोटे यांनी व्यक्त केली.

श्री क्षेत्र देहू येथील तुकोबांची पालखी नेणा-या एसटी बसचे सारथ्य करण्याची संधी तळेगाव दाभाडे आगाराचे चालक शहाजी खोटे यांना मिळाली. देहू येथून मंगळवारी (ता. ३०) दुपारी २० वारकरी आणि एका पोलिसाला घेऊन निघालेली एमएच-१३ सीयु-८४७३ क्रमांकाची तळेगाव दाभाडे आगाराची बस पाटस-इंदापूर-बारामती-अकलूज-वाखरी असा पारंपरिक पालखी मार्गाने प्रवास करत रात्री साडेदहाला पंढरपूरला पोहचली. 

भजन संकीर्तन आणि विठुनामाच्या गजरात साडेआठतासांचा प्रवास कसा सरला याचेही भान उरले नाही. मात्र, गेल्या अनेक शतकानंतर यंदा कोरोनामुळे वारीची परंपरा खंडीत झाली. लाखो वैष्णव विठोबाच्या दर्शनाला मुकले. एसटी महामंडळाचे उत्पन्नही बुडाले याची खंत वाटत आहे, अशी भावना खोटे यांनी व्यक्त केली. पालखीसाठी घेऊन जाण्यापूर्वी या बसची एसटीच्या दापोडी कार्यशाळेत देखभाल,तपासणी आणि सॅनिटायझेशन करण्यात आले होते.

मुळचे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मुगगावचे असलेले शहाजी कल्याण खोटे हे २०१५ साली एसटी महामंडळाच्या तळेगाव दाभाडे आगारात चालक म्हणून रुजू झाले आहेत. कोरोना लाॅकडाऊनमध्ये खोटे यांनी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर जाऊन परप्रांतीय कामगारांना सोडण्यासाठी बसच्या दोन खेपा केल्या आहेत.