पिंपरी-चिंचवडमधील व्यायामप्रेमी जिमला मुकणार; कारण...

पिंपरी-चिंचवडमधील व्यायामप्रेमी जिमला मुकणार; कारण...

पिंपरी : जागांचे हजारो रुपयांचे थकीत भाडे, कर्मचाऱ्यांचे वेतन यासह इतर खर्चांच्या बोज्याखाली शहरातील फिटनेस इंडस्ट्री दबली गेली असून, लहान-मध्यम स्वरूपाच्या 20 टक्के जिम बंद पडण्याच्या अवस्थेत आहेत. काही जिमचालकांनी स्वतःचा खर्च भागविण्यासाठी व्यायाम साहित्यदेखील विकण्यास सुरुवात केली आहे. 

शहरातील विविध भागांत 175 ते 180 हार्डकोअर जिम असून, सुमारे अडीचशेपर्यंत फिटनेस क्‍लब कार्यरत आहेत. दर महिन्याला काही लाखांमध्ये उलाढाल करणाऱ्या जिम-क्‍लब यांची आर्थिक प्रकृती ढासळू लागली आहे. शरीरसौष्ठव क्षेत्रातील माजी खेळाडूंनी जागा भाड्याने घेऊन हार्डकोअर जिम सुरू केल्या आहेत. त्यांच्यावरच मुख्यत्वे संकट कोसळले आहे. काही जिम बंद पडण्याच्या अवस्थेपर्यंत आल्या आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पिंपरी-चिंचवड बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे सचिव राजेश सावंत म्हणाले, "शहरात काही जिम दोन ते तीन कोटी रुपये खर्चून उभारण्यात आल्या आहेत. काही जिमची साखळी आहेत. ज्यांच्याकडे पैसा आहे. त्याच जिम आता चालू राहतील. मात्र, जवळपास 70 टक्के जिमच्या जागा भाड्याने चालविल्या जात आहेत. मोठ्या जिमचे दरमहा भाडे 70 हजारांपासून दीड लाख रुपयांपर्यंत इतके आहे. तर लहान-मध्यम स्वरूपाच्या जिमचे भाडे 40 हजार रुपये इतके आहे.

टाळेबंदी लागू होण्यापूर्वी प्रत्येक महिन्याला मोठ्या जिममधून 10 ते 15 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असे. तर लहान जिमचे सर्व खर्च वजा जाता एक लाखांपर्यंतची कमाई होत असे. परंतु, फिटनेस इंडस्ट्री पुरती अडचणीत आली आहे. काही जागामालकांकडून जिमचालकांना भाड्याची विचारणा होत आहे. मात्र, बहुतेक जिमचालक पूर्णभाडे देण्याच्या स्थितीत नाहीत. तर काही चालक निम्मे भाडे देण्याची तयारी दाखवित आहेत. त्यामुळे फिटनेस इंडस्ट्री धोक्‍यात आली असून, राज्य सरकारने त्यासाठी आर्थिक मदत करावी.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

लहान-मध्यम स्वरूपाच्या जिममध्ये तीन ते चार प्रशिक्षक काम करतात. मोठ्या जिममध्ये ही संख्या आठपर्यंत आहे. त्यांचे प्रलंबित वेतन, जागेचे थकीत भाडे, वीजबिले, व्यायाम साहित्याची देखभाल-दुरुस्ती यावर जिमचालकांना खर्च करावा लागणार आहे. 

"मागील आठ वर्षांपासून वाकड येथे हार्डकोअर जिम चालवित आहे. आम्हाला सप्लिमेंट विक्री, जिमचे शुल्क आणि व्यक्तिगत प्रशिक्षणामधून उत्पन्न मिळत होते. माझ्या जिमचे 25 हजार इतके दरमहा भाडे आहे. सहा प्रशिक्षकांना केवळ निम्मेच पगार देता आले आहेत. माझे सर्व कर्मचारी कामावर येण्यास तयार आहेत. परंतु, जिम उघडता येत नाही. टाळेबंदी उठल्यावरही आमचा व्यवसाय पूर्वीप्रमाणेच चालू राहील, याबद्दल साशंकता वाटते. जागेच्या मालकाने सहकार्य केले नाही, तर मला माझे व्यायाम साहित्य विकावे लागेल.''
- आदेश ढोरे, जिमचालक, वाकड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com