मावळ : बेडसे लेणीजवळ आढळल्या दोन गुहा

दक्ष काटकर 
Friday, 28 August 2020

  • एका गुहेत आढळले शिवलिंग पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी 

टाकवे बुद्रूक (ता. मावळ) : बेडसे येथील प्राचीन बौद्ध लेणीपासून काही अंतरावर दोन गुहा आढळून आल्या असून, त्यातील एका गुहेत शिवलिंग आढळले आहे. या गुहा व शिवलिंग पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करीत आहेत. 

वडगावात 28 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतींचे विसर्जन

मावळ तालुक्‍याला गडकिल्ल्यांचे वैभव लाभले आहे. गडकिल्यांबरोबर येथे कार्ला, बेडसे, भाजे, कोंढाणे यासारख्या प्राचीन लेण्या आहेत. मावळात अनेक अर्धवट स्वरूपात कोरलेल्या लेण्या आढळतात. बेडसेतील राम ज्ञानू दहिभाते, राम हनुमंत दहिभाते, मयूर दहिभाते व सुरेश तोडकर हे रानभाज्या आणण्यासाठी डोंगरात गेले असताना त्यांना या दोन गुहा आढळून आल्या. एक लहान गुहा दगडावर दगड रचून बंद केलेल्या स्वरूपात आढळून आली तर दुसरी गुहा वाढलेल्या झाडांमुळे दिसत नव्हती. स्थानिक नागरिकांनी रचलेले दगड काढून लहान गुहेत धाडस करून आतमध्ये गेले असता त्यांना दीड फूट खोल पाण्याच्या कुंडात छोटे काळ्या पाषाणातील शिवलिंग दिसले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पहिली गुहा 
- गुहेचे तोंड खूप लहान असल्याने फरफटत जावे लागते 
- वीस फूट लांब आहे 
- दीड फूट खोल पाण्याच्या कुंडात काळ्या पाषाणातील शिवलिंग 

 
दुसरी गुहा 
- दुसऱ्या गुहेचे तोंड मोठे असून 30 फूट लांब 
- आत गेल्यावर गुहा निमुळत्या स्वरूपाची आहे 
- गुहेत एक माणूस झोपू शकेल अशी जागा 

 
पूर्वी बेडसे लेणी कोरण्याचे कामे चालू असताना तात्पुरत्या स्वरूपात राहण्यासाठी किंवा त्याअगोदर ध्यानधारणा करण्यासाठी या नैसर्गिक गुहांचा वापर केला असावा. लहान गुहेत पाण्याचे कुंड आहे आणि त्या कुंडात बारा महिने पाणी राहत असावे म्हणून इथे राहण्यासाठी वापर केलेल्या व्यक्तीने किंवा ध्यानधारणा केलेल्या व्यक्तीने कुंडात पिंड ठेवली असावी, असा अंदाज आहे. 
- राज बलशेटवार, इतिहास अभ्यासक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two caves found near bedse cave maval taluka