वडगावात 28 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतींचे विसर्जन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 August 2020

वडगाव नगरपंचायतीने काही प्रभागात विसर्जन हौदांची व्यवस्था केली होती.

वडगाव मावळ (पुणे) : ना मिरवणूक, ना वाद्य पथकांचा गजबजाट. परंतु, 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या जयघोषात येथे घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.

वडगाव परिसरात बहुतांशी घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे सातव्या दिवशी विसर्जन केले जाते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणूक व सार्वजनिक ठिकाणांवर विसर्जनाला निर्बंध घालण्यात आले होते. वडगाव नगरपंचायतीने काही प्रभागात विसर्जन हौदांची व्यवस्था केली होती. नगरसेविका पूजा वहिले यांनी प्रभागात वाहनावर फिरत्या हौदाची सोय केली होती. काही नागरिकांनी श्रींच्या मूर्तींचे घरीच विसर्जन केले. सायंकाळपर्यंत घरगुती गणपतीचे विसर्जन झाले. 

पिंपरी-चिंचवड शहरात मू्र्तीदानाला प्रतिसाद; नियमांचे पालन करून बाप्पाला निरोप 

मानाच्या श्री. पोटोबा देवस्थान संस्थानच्या गणपतीची आरती पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर व गणेश तावरे यांच्या हस्ते झाली. नंतर महादेव मंदिर विहिरीत विसर्जन करण्यात आले. यावेळी मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, गणेश ढोरे, अनंता कुडे, किरण भिलारे, चंद्रकांत ढोरे, अँड तुकाराम काटे, तुकाराम ढोरे, अरुण चव्हाण, सुभाष जाधव ,पुजारी सुरेश गुरव, पुरोहित विश्वास भिडे आदी उपस्थित होते. मानाच्या जय बजरंग तालीम मंडळाच्या गणपतीचे विसर्जन अध्यक्ष उमेश ढोरे, अमित मुसळे, सागर बरदाडे, योगेश तुमकर, मुकुंद वाळुंज आदींच्या उपस्थितीत झाले. 

पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार पाऊस, नागरिकांची तारांबळ

वडगाव नगरपंचायत, पोलिस प्रशासन, मावळ ग्रामीण पत्रकार संघ यांच्या वतीने आयोजित 'एक गाव, एक गणपती' उपक्रमात सहभागी झालेल्या 28 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतींचे विसर्जन नगराध्यक्ष मयूर ढोरे व मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात झाले. इतर सार्वजनिक मंडळांनीही शासनाच्या नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने विसर्जन केले. दुपारपासून सुरु झालेल्या संततधार पावसामुळे मात्र कार्यकर्त्यांच्या उत्साहावर काहीसे विरजन पडले.
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: immersion of 28 public ganeshotsav mandal ganesh idols in vadgaon maval