पैशांसाठी केला 'स्टील'च्या ट्रक चोरीचा प्लॅन, मात्र पोलिसांनी उधळला दोघांचा डाव

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

घर खर्चासह भिशीचे पैसे भरण्यासाठी स्टीलने भरलेला ट्रक चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जेरबंद केले.

पिंपरी : घर खर्चासह भिशीचे पैसे भरण्यासाठी स्टीलने भरलेला ट्रक चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून ट्रक व त्यातील लोखंडी स्टील, असा एकूण साडेअकरा लाखांचा मुद्‌देमाल जप्त केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शशिकांत आजिनाथ माने (वय 35) व विकास राजूरकर (वय 42, दोघेही रा. मोरेवस्ती, चिखली) अशी आरोपींची नावे आहेत. 12 ऑक्‍टोबरला समाधान नवनाथ खरात (रा. चिखली) यांच्या ट्रकवरील चालक आरोपी राजूरकर याने जालना येथून नऊ लाख 78 हजार 777 रुपये किमतीचे 23 टन लोखंडी स्टील ट्रकमध्ये भरून चिखली येथे आणला. हा ट्रक हरगुडे वस्ती येथे उभा करून तो घरी गेला. तो माल रावेत येथे एका साइटवर टाकायचा होता. दरम्यान, हा ट्रक चोरीला गेला. याविषयी समाधान खरात यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. याचा तपास गुन्हे शाखा युनिट एकचे पथक करीत होते.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तपासादरम्यान, हा ट्रक कारेगाव-केडगाव-दौंड रोडवर एका हॉटेलसमोर उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ट्रकच्या केबिनमध्ये बसलेल्या माने याच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्याने हा ट्रक मूळचालक राजूरकर याच्या सांगण्यावरून चोरल्याचे सांगितले. त्यावरून राजूरकर यालाही ताब्यात घेतले. दोघांकडे एकत्रित तपास केल्यावर त्यांनीच गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक केले. त्यांच्याकडून ट्रक व त्यातील लोखंडी स्टील, असा एकूण 11 लाख 66 हजार 777 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 18 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असा केला प्लॅन 
दोन्ही आरोपी एकमेकांचे मित्र असून, शेजारीच रहायला आहेत. राजूरकर हा जालना येथे गेला असता तेथे शशिकांत याच्याशी भेट झाली. ते दोघे जालना येथून पुण्याला येत असताना या चोरीचा प्लॅन केला. शशिकांत याला भिशीचे पंधरा हजार रुपये भरायचे होते. त्यानंतर चिखली येथे आल्यानंतर राजूरकर हा ठरल्यानुसार, ट्रक लावून घरी गेल्यानंतर पहाटेच्या वेळी शशिकांत हा ट्रक घेऊन पसार झाला. 

घर खर्च, भिशीसाठी चोरी 
माने मूळचा जामखेडचा असून, पाच वर्षांपासून ठाणे एसटी महामंडळात चालक म्हणून नोकरीस आहे. मात्र, लॉकडाउनपासून तो कामावर जात नव्हता. भिशीचे पैसे भरण्यासह घर खर्चासाठी पैसे लागत असल्याने दोघांनी मिळून हा प्लॅन केला होता. ट्रक चोरल्यानंतर डिझेल भरण्यासाठी पैसे नसल्याने राजूरकर हा पैसे घेऊन जाणार होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two person theft steel truck from jalna