esakal | पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामे सुसाट, पण कारवाईबाबत अधिकारी हतबल 
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामे सुसाट, पण कारवाईबाबत अधिकारी हतबल 
  • न्यायालयाचा आदेश व आचारसंहितेमुळे असमर्थता 

पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामे सुसाट, पण कारवाईबाबत अधिकारी हतबल 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : "आमच्या समोर अनधिकृत बांधकामे सुरू आहेत हो!, पण, आचारसंहितेमुळे आम्ही काहीच करू शकत नाही,'' हे शब्द आहेत, महापालिकेच्या एका अधिकाऱ्याचे. मात्र, जुन्या बांधकामावर वाढीव बांधकाम करताना घडणाऱ्या दुर्घटना धोकादायक ठरत आहेत, हे शुक्रवारी (ता. 20) मासूळकर कॉलनीत घडलेल्या घटनेवरून पुन्हा अधोरेखित झाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउनच्या काळात शहरात अनेक अनधिकृत बांधकामे झाली आहेत. त्यात काही नवीन आहेत. काही वाढीव आहेत, तर काही जुन्या बांधकामांमध्ये बदल केलेले आहेत. अशी बांधकामे शोधण्यासाठी महापालिकेने खासगी संस्थेची नियुक्ती केली आहे. त्यांच्यामार्फत गेल्या दीड महिन्यात पंधरा हजार अनधिकृत बांधकामे आढळली आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामांवर 31 डिसेंबरपर्यंत कारवाई करता येणार नाही. शिवाय, विधानपरिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आचारसंहिता आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला केवळ बघत बसण्याशिवाय पर्याय नाही. त्याचाच गैरफायदा घेऊन अनधिकृत व वाढीव बांधकामे सर्रास सुरू आहेत. अर्धा गुंठा जागेवर तीन-तीन मजले उभारले जात आहेत. पत्राशेडची संख्या वाढली आहे. उपग्रहाद्वारे होणाऱ्या सर्वेक्षणातून या बाबी स्पष्टपणे दिसत आहेत. मात्र, प्रशासन हतबल आहे. 

का होताहेत बांधकामे 
लॉकडाउन काळात अनेकांचा रोजगार गेला आहे. व्यवसायात नुकसान झाले आहे. त्यामुळे काहींनी व्यवसायाचे स्वरूप बदलले आहे. चोविसावाडीतील हॉटेल बंद करून मालकाने बांधकामात बदल केला. तीन व्यापारी गाळे काढून भाडेतत्त्वावर दिले आहेत, यावरून अनधिकृत बांधकामे का होताहेत, याची वस्तुस्थिती लक्षात येते. 

अशी आहेत उदाहरणे 

  1. मासूळकर कॉलनी टी सेक्‍टर. अर्धा गुंठे जागेतील दुमजली घराचा पहिला मजला एकाने टेरेससह विकत घेतला. त्यावर बांधकाम केले. तिसरा मजला चढवला. त्यावर चौथा मजला चढवत असताना स्लॅब कोसळला. चार महिन्यांपूर्वी ही घटना घडली आहे. 
  2. नेहरूनगर. साधारणतः दहा फूट रुंद व तीस फूट रुंद जागा. चार मजली इमारत उभारणीचे काम सुरू आहे. ना पार्किंगला जागा, ना कुठली सुरक्षा व्यवस्था. गेल्यावर्षी या भागातच चार मजली इमारत कोसळली होती. 
  3. लांडगेनगर भोसरी. लॉकडाउनपूर्वी घर बांधण्यासाठी चौथरा व तळ मजल्याचे पिलर उभारले होते. महापालिकेने कारवाई करून पिलर पाडले. मात्र, लॉकडाउनमध्ये बांधकाम पुन्हा सुरू झाले. आता तिथे कॉंक्रिटची इमारत उभी असून, रहिवास सुरू झाला आहे.