भोसरीत रस्त्यांवर अनधिकृत पार्किंग; वाहनचालकांना ठरतोय अडथळा 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 September 2020

रस्ते अरुंद झाल्याने अपघाताची शक्‍यता; अनधिकृतपणे पार्किंग करणाऱ्यांवर कारवाईची मागणी 

भोसरी : येथील विविध रस्त्यांवर वाहने पार्क केल्यामुळे इतर वाहनांना अडथळा येत आहेत. पुरेशी जागा मिळत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अनधिकृतपणे वाहने पार्क करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालक आणि नागरिकांमधून होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिघी रस्त्यावर सिद्धेश्वर शाळा चौक ते गंगोत्री पार्कमधील लष्करी अभियांत्रिकी (सीएमई) सिमाभिंतीर्यंतच्या सुमारे अर्ध्या किलोमीटरपर्यंत वाहने लावलेली असतात. त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. हा रस्ता भोसरीतून दिघी, येरवडा, पुणे आदी भागांकडे जाणारा जवळचा मार्ग आहे. त्याचप्रमाणे दिघीकरांना भोसरी, पिंपरी-चिंचवड शहर परिसरात जाण्यासाठीही जवळचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची नेहमीच गर्दी असते. याशिवाय भोसरीतील कै. सखूबाई गवळी उद्यानालगत आळंदी रस्त्यापासून दिघी रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावरही वाहने लावलेली दिसतात. यातील बरीच वाहने काही वर्षांपासून लावलेली असून, बेवारस आहेत. लांडेवाडील विठ्ठल मंदिर ते पुणे-नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावरही खासगी प्रवासी वाहने लावली जातात. इंद्रायणीनगर चौक ते इंद्रायणी कॉर्नर या नव्याने विकसित झालेल्या रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावली जात आहेत. त्यामुळे अशा वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालक आणि नागरिकांमधून होत आहे. 

यू-टर्न घेणाऱ्या वाहनांना अडचण 

पीएमटी चौकातील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली आळंदी रस्त्यावरून येणारी वाहने मोशीकडे वळविण्यासाठी गाळा रिकामा सोडला आहे. पूर्वी या ठिकाणी पीएमपीचा बस थांबा होता. मात्र, वाहने वळविताना अडचण येऊ नये म्हणून हा थांबा भोसरी-आळंदी रस्ता चौकात हलविण्यात आला. मात्र, रिकाम्या झालेल्या बस थांब्यावर खासगी वाहने थांबविण्यात येत आहेत. त्यामुळे या ठिकाणाहून यू-टर्न घेणाऱ्या वाहनांना अडचण होत आहे. 

दिघी रस्त्यावर बॅडमिंटन हॉलजवळ उतार आहे. रस्त्याच्या कडेला वाहने लावल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली असून, या उतारावर अपघात होण्याची शक्‍यता आहे. 
- ज्ञानेश्वर भोसले, वाहनचालक 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रस्त्यावर अनधिकृतपणे लावलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांची कारवाई दररोज सुरू आहे. पीएमटी चौकात उड्डाणपुलाखाली लावलेल्या वाहनांना जॅमरही लावण्यात येत आहेत. या ठिकाणी वाहने लावू नयेत म्हणून बॅरिकेडही लावलेले आहेत. दिघी रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या वाहनांवरही कारवाई करण्यात येईल. 
- शिवाजी गवारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, भोसरी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unauthorized parking on Bhosari roads