महापालिकांच्या समिती अध्यक्षांची बिनविरोध निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PCMC

महापालिकांच्या समिती अध्यक्षांची बिनविरोध निवड

पिंपरी : महापालिकेच्या पाच विषय समित्यांच्या अध्यक्षांची गुरुवारी बिनविरोध निवड झाली. या पदांसाठी केवळ सत्ताधारी भाजपच्याच सदस्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित होती. त्याची अधिकृत घोषणा आज करण्यात आली.

महापालिकेच्या विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, क्रीडा- कला- साहित्य व सांस्कृतिक आणि शिक्षण या समित्यांची मुदत ऑक्टोबरमध्ये संपली होती. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या सर्वसाधारण सभेत सर्व विषय समित्यांच्या सदस्यांची निवड करण्यात आली. प्रत्येक समितीत प्रत्येकी नऊ सदस्य आहेत. सभागृहातील पक्षीय बलाबलानुसार प्रत्येक समितीत सत्ताधारी भाजपचे पाच, विरोधी पक्ष राष्ट्रवादीचे तीन आणि शिवसेनाचा एक सदस्य आहे. त्यातील एकाची अध्यक्षपदी निवड करायची होती.

हेही वाचा: महापालिका निवडणुकीत चिन्ह हटवण्याची मागणी

त्यासाठी गुरुवारी (ता. १८) सकाळी अकरा वाजता विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे सभागृहात समितीनिहाय विशेष सभा घेण्यात आली. पुणे विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार पीठासन अधिकारी होते. निवडणूक प्रक्रियेवेळी उपायुक्त अजय चारठाणकर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे आदी उपस्थित होते. नगरसचिव उल्हास जगताप यांनी सर्व सभांचे कामकाज पाहिले.

दरम्यान, विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना सदस्यांनी अर्ज दाखल केले नव्हते. सत्ताधारी भाजपच्याच सदस्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याची अधिकृत घोषणा गुरुवारी पीठासन अधिकारी डॉ. खेमनार यांनी केली. दरम्यान, विषय समित्यांच्या नवनिर्वाचित अध्यक्षांचे महापौर उषा ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले व पक्षनेते नामदेव ढाके यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

समितीनिहाय अध्यक्ष

  • विधी समिती : स्वीनल म्हेत्रे

  • महिला व बालकल्याण समिती : सविता खुळे

  • शहर सुधारणा समिती : अनुराधा गोरखे

  • क्रीडा- कला- साहित्य व सांस्कृतिक : उत्तम केंदळे

  • शिक्षण समिती : माधवी राजापुरे

loading image
go to top