'वायसीएम' प्लाझ्माथेरपी कक्ष की फोटोशूट डेस्टिनेशन?

'वायसीएम' प्लाझ्माथेरपी कक्ष की फोटोशूट डेस्टिनेशन?

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात प्रसिद्धीच्या हव्यासापोटी चमकोगिरी करणारे कधी काय करतील याचा नियमच राहिला नाही. सर्वात प्रथम कोरोना काळात प्रसिद्धीपोटी योद्‌ध्याची प्रमाणपत्रे वाटली गेली. त्यानंतर रक्तदानचेही फोटोशूट झाले. आता हॅट्रीक म्हणजे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) प्लाझ्माथेरपी कक्ष हे नवे फोटोशूट डेस्टिनेशन झाले आहे. आमदारांपासून, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी चक्क प्लाझ्मादात्याच्या प्लाझ्मादान प्रक्रियेतील प्रत्येक क्षणापर्यंतच्या चित्रीकरणाचा बाजारच रक्तपेढीत मांडला आहे. प्लाझ्मा थेरपी प्रक्रिया म्हणजे निवडणुकीत मतं मिळविण्यासाठीचे राजकारण सुरु असल्याची चर्चा वायसीएममध्ये सुरु झाली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वायसीएम रक्तपेढीत दिवसाकाठी प्लाझ्मादानासाठी व घेण्यासाठी येणाऱ्यांची वर्दळ सुरु असते. प्लाझ्माचे मशीनही एकच आहे. त्यामुळे वेटिंगवर असणारे वेगळेच. प्लाझ्मादाता शोधण्यापासून त्याला रक्तपेढीपर्यंत घेऊन येण्याचा खटाटोप मोठा असतो. त्यानंतर प्रक्रियेसाठी दोन ते तीन तास जात आहेत. दात्याचा आहार व्यवस्थित आहे की नाही हे पाहिले जाते. त्याच्या शरीरातील इतर तपासण्यांसह हिमोग्लोबिन व वजनही तपासले जाते. कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली जाते. यात बराच अवधी जातो. कित्येकजण प्लाझ्मा देण्यासाठी तयार होतात तर काहीजण दान करण्यासाठी इच्छुकही नसल्याचे दिसून आले आहे. मात्र, प्लाझ्मा देणारे हे सर्व जण कोरोना बाधित रुग्णच असल्याने त्यांची माहिती जाहीर करणे चुकीचे आहे.

बऱ्याच रुग्णांचा धोका पूर्णपणे टळलेलाही नसतो. शरीरात हवी तितकी ताकद नसते. कोरोनातून रुग्ण पूर्णपणे सावरलेलाही नसतो. दात्याची मानसिकताही वेगळीच असते. त्याला फोटो व व्हिडीओ करण्यात जराही रस नसतो. काही जण तर प्लाझ्मादात्याला प्लाझ्मादानासाठी जबरदस्ती करत असल्याचेही दिसून आले आहे. अशा परिस्थितीत कोरोना बाधित व्यक्तीने स्वच्छेने प्लाझ्मादान करणे गरजेचे आहे. प्रसिद्धीचा या नव्या फंड्याने मात्र दात्याची भंबेरी उडत आहे. राजकीय मंडळीचा कॉल गेल्यासही त्या रुग्णांची पंचाईत होते.

राजसाहेबांच्या भेटीने मनसैनिकांना दहा हत्तींचे बळ

प्लाझ्मादान करणे कौतुकास्पद आहे. मात्र, सध्या प्रसिद्धीच जोरात वाढली आहे. कोणाला आम्ही काही बोलत नाही. बरीच राजकीय मंडळीही यामध्ये सामील असतात. कार्यकर्ते असतात. मशीनच्या खरेदीची चौकशीही बरेच जण करतात. इतर साहित्य खरेदीचीही विचारपूस सुरु असते. काहींचे हेतू चांगले तर काहींचे वाईट आहेत. -तुषार पाटील, रक्तपेढी प्रमुख

प्लाझ्मादाते म्हणतात...
आम्ही पूर्णपणे बरे झालो तरी मनात धाकधूक कायम असते. कोणाचा तरी जीव वाचविण्यासाठी प्लाझ्मा आम्ही देतो. मात्र, तब्बल दोन ते तीन तास कामधंदा सोडून आम्ही रक्तपेढीत जाऊन बसतो. बरेच कार्यकर्तेही मागे-पुढे असतात. फोटो काढण्याची इच्छा जराही नसते. कौतुक हे चार चौघातही होते. त्यासाठी सोशल मीडियावर जग जाहीर करण्याची गरज नाही. पण याला आळा घालणार कोण?

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com