स्कूल बसचालकांची जगण्यासाठी धडपड सुरूच; चालक काय म्हणतायेत वाचा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

  • भोसरी, दापोडीतील चालकांची व्यथा; इतर व्यावसायातून भागवताहेत चरितार्थ 

भोसरी : "शाळा बंद झाल्यानं आमच्या व्हॅनची चाकेही थांबली. आमचा रोजगार हिरावला गेला. कामही कुठे मिळेना. त्यामुळे व्हॅनचा उपयोग करत फळे विक्रीचा व्यवसाय सुरू केला,'' असं दापोडीतील विनियार्ड चर्चजवळ फळेविक्री करणारे स्कूल व्हॅनचालक सुनील झीटे सांगत होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनने सर्वच व्यवहार ठप्प झाले. शाळाही मार्चपासून बंद झाल्या. त्यामुळे शहर परिसरातील विद्यार्थ्यांची ने-आण करणारे बस व व्हॅनचालक यांचेही काम थांबले. उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली. इतरत्र काम शोधूनही न मिळाल्याने काही वाहनचालकांनी भाजी व फळे विक्रीचा व्यवसाय सुरू केला. काहींनी खासगी कंपनीत बस लावली. ""फळे विक्रीचा अनुभव नसल्याने सुरुवातीला घाऊक विक्रेत्याने निकृष्ट फळे देऊन फसगत केली. मात्र, आता व्यवसायातून चार पैसे मिळू लागल्याने संसाराचा गाडा सुरू आहे,'' असे झीटे समाधानाने सांगत होते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

भोसरीतील बसचालक संतोष मोरे म्हणाले, "शाळा बंद झाल्याने रोजगार थांबला. सहा महिने बस घरासमोर उभी होती. सप्टेंबरमध्ये स्कूल बसचे लेबल काढून बस एका कंपनीत लावली आहे.'' दिघी रस्त्यावर विजय झगडे यांनी स्कूल बसचा उपयोग भाजीविक्रीसाठी केला आहे. चालक पंकज ओव्हाळ म्हणाले, "काही पालकांकडे स्कूलव्हॅनचे भाडे थकले. मात्र, लॉकडाउनमुळे त्यांचेही काम गेल्याने फी मिळाली नाही. त्यामुळे काही काळ भोसरीत मसाला दूधची गाडी लावली. तिही संचारबंदीमुळे बंद करावी लागली. सध्या कपडे विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.'' दरम्यान, कोरोनाचे संकट जाऊन पुन्हा शाळा सुरू होण्याची वाट स्कूल बस-व्हॅन चालक पाहत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सद्यःस्थिती काय? 
- स्कूल बस, व्हॅन, रिक्षाचालकांचा व्यवसाय ठप्प 
- वाहनांचा उपयोग फळे-भाजी विक्रीसाठी 
- काहींनी कंपनीत वाहने लावली 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: use of school bus for selling vegetables in bhosari dapodi