भोसरी : महावितरण कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा, विजबिलांची होळी करून निषेध

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 September 2020

वंचित आघाडीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

भोसरी : कोरोनामुळे नागरिकांची कामे गेली. जगणेही मुश्‍कील झाल्याने मार्च ते सप्टेंबरपर्यंतची महावितरणने राज्यातील घरगूती, सूक्ष्म, मध्यम व लघू उद्योजक आदींना पाठविलेली विजबिले पूर्णतः माफ करावीत. या पुढे दोनशे युनिटपर्यंतची वीज मोफत देण्याबरोबरच वीज दरामध्ये कपात करण्याच्या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडीद्वारे महावितरणच्या भोसरीतील टेल्को रस्ता बालाजीनगरजवळील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

वंचित आघाडीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. वंचितचे प्रवक्ते के. डी. वाघमारे, महासचिव रहिमभाई सय्यद, राजन नायर, राजेश बारसागळे, शांताराम खुडे, सनी गायकवाड, शारदा बनसोडे, बबन सरोदे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. विजबिले माफ करण्याच्या घोषणेबरोबरच महावितरणने वीजग्राहकांना पाठविलेल्या विसंगत बिलाबद्दल निषेध करण्यात आला. विजबिलांची होळी करून महावितरणचा निषेधही करण्यात आला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तायडे म्हणाले, "लॉकडाउनमुळे अनेकांचे काम आणि व्यवसाय ठप्प झाले. नागरिकांचे जगणेही मुश्‍कील झाले असताना महावितरणने पाठविलेल्या विजबिलामुळे वीजग्राहक मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे महावितरणने राज्यातील सर्वांचे विजबिल सरसकट माफ केले पाहिजे. त्याचप्रमाणे दर महिना दोनशे युनिट वीज मोफतही दिली पाहिजे. वाढविलेले वीज दरही कमी केले पाहिजेत. महावितरणने मागण्या मान्य न केल्यास ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखील तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.'' आंदोलनकर्त्यांनी मागणीचे निवेदन महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी विकास आल्हाट यांना दिले. राज्य सरकारच्या आदेशानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे आल्हाट यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vanchit bahujan aghadi agitation on bhosari MSEDCL office