पिंपरी-चिंचवडमधील भाजी मंडई पडल्या ओस; विक्रेते, ग्राहक फिरकेना! 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 December 2020

वापरात नसलेल्या जागेवर दारूच्या पार्ट्या, जुगाराचे अड्डे तयार; पालिकेचा कोट्यवधींचा खर्च वाया 

पिंपरी : महापालिकेने लाखो रुपये खर्च करून जागोजागी भाजी मंडईसाठी इमारती बांधल्या. मात्र, लोकप्रतिनिधींच्या आशीवार्दाने विक्रेत्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले आहे. मंडई गैरसोयीच्या ठरवत विक्रेते आणि ग्राहकही फिरकत नसल्याने गेल्या दहा-पंधरा वर्षापासून ओस पडल्या आहेत. सद्यःस्थितीत आठ मंडई इमारती वापरात नसल्याने दारूच्या पार्ट्या, जुगाराचे अड्डे तयार झाल्याचे वस्तुस्थिती आहे. परिणामी कोट्यवधी रुपये खर्च वाया गेल्याने महापालिकेचे अर्थचक्र बिघडले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

नागरिकांना सोय व्हावी, यासाठी महापालिकेने शहरात मंडईसाठी प्रशस्त इमारती उभारल्या. त्यासाठी मोठया प्रमाणात खर्चही केला. जवळपास 14 ठिकाणी मंडई बांधल्या आहेत. मात्र, चुकीच्या ठिकाणी इमारती असल्याचे सांगत भाडेदर विक्रेत्यांना परवडत नाही, असे म्हणून गाळे घ्यायला कोणी उत्सुकच नसतो. निविदा काढल्या जातात, त्यास प्रतिसाद मिळत नाही. परिणामी, या इमारती मोकळ्या राहतात आणि विक्रेते रस्त्यावरच ठाण मांडून बसतात. त्यामुळे अतिक्रमण, वाहतूक कोंडी, असे अनेक प्रश्‍न नव्याने निर्माण झाले आहेत. एकूणच मंडईवरून स्थानिक पातळीवर बरेच राजकारण आणि अर्थकारण चालते. महापालिकेतील अधिकाऱ्यांचे विक्रेत्यांशी लागेबांधे असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे तक्रार करूनही अतिक्रमण विभागाकडून कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रतिदिवस 40 रुपये भाडे 
विस्थापितांसाठी हे गाळे बांधण्यात आले. मात्र, यासाठी महापालिकेने जो दर ठरविला आहे. त्याप्रमाणे काही मंडईंमधील गाळ्यांचे दर प्रतिदिन अवघे चाळीस रुपये आकारले जाते. महिन्याकाठी फक्त बाराशे ते सतराशे रुपये होतात, असे असतानाही परवडत नसल्याचे सांगून अनेक विक्रेत्यांनी महापालिकेच्या गाळ्यांकडे पाठ फिरवली आहे. दुसरीकडे मात्र, रस्त्यावर व्यवसाय करण्यासाठी लोकप्रतिनिधींना ठराविक रक्कम दिली जाते. एकूणच लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे महापालिकेचे उत्पन्न बुडत आहे, असल्याचे नागरिक सांगतात. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सात बंदच, एक मोडकळीस 
सावता माळी पिंपरीगाव, मासूळकर कॉलनी, आकुर्डी विवेकनगर नाल्यावरील, धावडेवस्ती-भोसरी, डांगेचौक-वाकड, खंडोबा मंदिर आकुर्डी, गांधीपेठ चिंचवड अशा बंद पडलेल्या मंडई आहेत, तर दोन वर्षांपासून रामनगरमधील गाळे मोडकळीस आले आहेत. पत्रे उडून गेले, साहित्य चोरीला गेले आहे. 

मंडई असताना आठवडे बाजार कशाला? 
आठवडे बाजारात बसण्यावरून आणि भरविण्याच्या जागेवरून फेरीवाल्यांमध्ये अनेकदा हाणामारीचे प्रकार घडले आहेत. तोपर्यंत कारवाई होते; पण, त्यांची पाठ फिरताच परिस्थिती 'जैसे थे' होते. प्रत्येक वॉर्डात भाजी मंडई बांधलेली आहे, तरीही त्या मंडईत बसण्याऐवजी आठवडे बाजार भरविण्यात येतो. महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे सुसज्ज भाजीमंडईऐवजी जागा मिळेल तिथे भाजीविक्रेते ठाण मांडून आहेत. याउलट दिवसभर व्यवसाय करून रात्री साहित्य ठेवण्यासाठी या मंडईमधील जागेचा वापर करीत आहेत. 

महापालिकेने परवडणाऱ्या दरात भाजी मंडईतील गाळे उपलब्ध केले आहेत, तरीही विक्रेत्यांकडून प्रतिसाद मिळते नाही. सर्वांच्या सहकार्यानेच मंडई वापराचा प्रश्‍न सुटू शकतो. 
- मुकेश कोळप, प्रशासन अधिकारी, भूमी व जिंदगी विभाग 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vegetable market in pimpri chinchwad fell dew