
डिझेल, पेट्रोल व सीएनजी या इंधनांच्या गगनाला भिडलेल्या किंमतींमुळे नागरिक आता इलेक्ट्रिक वाहनांना अधिक पसंती देऊ लागले आहेत.
Vehicle Charger Gudi : वाकडच्या ऐश्वर्या सोसायटीने उभारली वाहन चार्जरची गुढी
वाकड - डिझेल, पेट्रोल व सीएनजी या इंधनांच्या गगनाला भिडलेल्या किंमतींमुळे नागरिक आता इलेक्ट्रिक वाहनांना अधिक पसंती देऊ लागले आहेत. असे असले तरी त्या वाहनांसाठीचे चार्जर स्टेशन ही पण एक अडचणीची बाब बनली आहे. याचा विचार करून वाकड कस्पटे वस्ती येथील ऐश्वर्या रेसिडेन्सी सोसायटीने रहिवाशांसाठी अद्ययावत चार्जर स्टेशन साकारत अनोखी गुढी उभारली.
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर माजी नगरसेवक राहुल कलाटे व सोसायटी सदस्यांच्या हस्ते या चार्जर स्टेशनचे उदघाटन करून ते वापरासाठी खुले करण्यात आले. यावेळी सचिव अनुराधा ठाकूर, खजिनदार पराग तन्ना, सुनील बाजारी, प्रशांत सिंघा, आशिष चौरसिया, विजय जाधव, अमेय वेलूलकर, कृनाल तिडके, ज्ञानेश्वर वरपे, नीळकंठ चोपडे, प्रशांत साकोरकर यांच्यासह सोसायटीचे सर्व सदस्य उपस्थित होते. या स्टेशनमध्ये एकाच वेळी विविध कंपन्यांच्या पाच दुचाकी व दोन मोटारी चार्ज करता येणार असल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष सत्यम कुमार सिंह यांनी उपस्थितांना दिली.
सोसायटीने रेन हार्वेस्टिंग, सोलर रूफटॉप प्लांट आणि वृक्षारोपण यांसारख्या हरित उपक्रमांमध्येही योगदान दिले आहे. त्यामुळे सोसायटीची वीज आणि पाणी बिल जवळपास शून्य झाले आहे याचा फायदा सोसायटीतील रहिवाशांना होत आहे. पर्यावरण पूरक विविध उपक्रम राबवून परिसर व समाजाचे हित जपत पर्यावरण संवर्धनासाठी कायम कटिबद्ध असणाऱ्या ऐश्वर्या रेसिडेन्सी सदस्यांचा मला नेहमीच अभिमान वाटतो असे कौतुकाचे उदगार काढत राहुल कलाटे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.