पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा वाहनांची तोडफोड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

पिंपरी-चिंचवड शहरात वाहन तोडफोडीचे सत्र थांबत नसल्याचे दिसून येत आहे. 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात वाहन तोडफोडीचे सत्र थांबत नसल्याचे दिसून येत आहे. चिखलीतील जाधववाडी येथे पाच जणांच्या टोळक्‍याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. 'तू आमच्यासोबत का राहत नाही', असे म्हणत या टोळक्‍याने घरासमोरील वाहनांना लक्ष्य केले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दत्ता देवकर, संतोष चौगुले, राहुल (रा. मोहननगर, चिंचवड) यासह आणखी दोघांवर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी सुनील गंगाराम कुसाळकर (वय 28, रा. कॉलनी नंबर सात, जाधववाडी, चिखली) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. बुधवारी (ता. 29) रात्री साडेअकराच्या सुमारास आरोपी हे लाकडी दांडके व कोयता घेऊन फिर्यादीच्या घरासमोर आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

'तु आमच्यासोबत का राहत नाही? तुला खूप माज आलाय का', असे म्हणत फिर्यादीच्या घरासमोरील दोन दुचाकींसह त्यांचे भाडेकरू नागनाथ मोरे यांच्याही दुचाकीची कोयते, लाकडी दांडके व दगडाने तोडफोड केली. यामध्ये वाहनांचे नुकसान झाले. चिखली पोलिस अधिक तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vehicle vandalised again in Pimpri-Chinchwad