अजितदादा लढवय्या नेता

Vilas-Lande-with-Ajit-Pawar
Vilas-Lande-with-Ajit-Pawar

संत तुकाराम महाराजांची पालखी शहराच्या निगडी प्रवेशद्वारावरून जाते. याचे महत्त्व लक्षात घेऊन तेथे संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचे भक्ती-शक्ती शिल्प असणे गरजेचे असल्याची विनंती  मी महापौर असताना दादांना केली. माझ्या विनंतीची दखल दादांनी घेतल्याने शहराची शान वाढविणारे भक्ती-शक्ती शिल्प तेथे आकाराला आले. लोकहितासाठीचे अनेक विकासप्रकल्प पिंपरी-चिंचवड शहरात दादांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आले. त्यात गरीबांसाठी गृहप्रकल्प, निगडी ओटास्कीम, रस्ते, उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, उद्याने, आरोग्य सेवेसाठी मोठी रुग्णालये तसेच इतरही लोकोपयोगी प्रकल्पांचा उल्लेख करता येईल. या शहराच्या विकासासाठी धडाडीने काम करणारा, झटणारा आणि तरुणांचा नेता म्हणजे अजितदादा आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एक कार्यकर्ता म्हणून सर्वप्रथम मी जेव्हा अजितदादांकडे पाहिले तेव्हा त्यांच्यामध्ये मला एक मनाला समाधान देणारा तरुण पिढीतला खरा नेता भावला. ज्येष्ठ नेते शरद पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदादा जेव्हा काम करत होते. त्यावेळी मी त्यांच्या संपर्कात आलो. ते बारामतीतून तालुक्‍यातील शेतकरी, कष्टकरी व अन्य लोकांच्या कामांसाठी कलेक्‍टर ऑफिसला यायचे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या विविध विभागातीस कामांच्या पाठपुराव्यासाठी दर सोमवारी ते येत. त्यावेळी त्यांच्या रूपाने एक चांगला नेता आपल्याला मिळणार आहे, असे लक्षात आले. साहेबांनंतर दादांकडे पाहिले जाऊ लागले. त्यावेळी १९९०-९१ मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून माझा त्यांच्याशी जवळून संबंध आला. त्यात भटक्‍या व अनुसूचित जातीजमातीसाठीची एक जागा पवारसाहेबांनी भोसरी परिसरात दिली. माझ्या शेजारी राहणारे प्रमोद उर्फ दादा गायकवाड यांना जिल्हा बॅंकेच्या पॅनेलवर घेतले.

जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून दादा पुढे आल्यानंतर १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून निवडणुकीस उभे राहिले. त्यानंतर प्रचाराच्या निमित्ताने दादांबरोबर फिरत असताना त्यांच्याशी जवळिक वाढली. पिंपरी-चिंचवडमध्ये दादा नवीन होते. कार्यकर्ता म्हणून त्यांची माझी सातत्याने भेट होत असताना त्यांच्या नेतृत्तवाखाली आपल्याला चांगले काम करण्याची संधी मिळणार असल्याचे जाणवले. पिंपरी-चिंचवड शहरातील त्यावेळची नेतेमंडळी पानसरे, जगताप, वाघेरे पाटील, भोईर, काळभोर, वाल्हेकर, लांडगे, पिंपळे, फुगे, काळजे, गव्हाणे, धावडे, चिंचवड, वाल्हेकर, कदम, बाबर, पवळे, कुटे, जवळकर, डोळस, मोरे, साने, नेवाळे, मळेकर, भालेकर, बोऱ्हाडे, आल्हाट, बोराटे, तापकीर, खेडकर, वाळके,  गायकवाड, परांडे, कलाटे, भोंडवे, विनोदे, तरस, वाकडकर, कस्पटे, बारणे, गुजर, पवार, बालघरे, गावडे, शिंदे, मासूळकर, लोंढे, वाखारे, मुथा अशा अनेक आजीमाजी नगरसेवकांबरोबर त्यांना पिंपरी-चिंचवड शहरात काम करायची संधी मिळाली.

पवारसाहेब निवडणुकीला उभे असतानाही पिंपरी-चिंचवडमधून त्यांना मतदान कमी होई. परंतु, अजितदादांना पिंपरी-चिंचवड शहरातून मोठे मताधिक्‍य मिळाले. ते खासदार झाल्यानंतर काही महिन्यांनी पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात आले. मंत्री म्हणून काम करत असताना १९९२ मध्ये महानगरपालिकेची निवडणूक लागली त्या निवडणुकीच्यावेळीही आम्ही दादांबरोबर काम केले. त्यावेळी दादांना येथील गटबाजी ठावूक नव्हती. या निवडणुकीत मला पक्षाने तिकीट दिले नाही. पण दादांचे कार्यकर्ते म्हणून मी, काका लांडे आणि प्रल्हाद सुधारे असे तिघे जण अपक्ष म्हणून निवडणूक लढवून महापालिकेवर निवडून गेलो. आम्ही निवडून आल्यानंतर दादांचा पहिला फोन आम्हाला आला आणि या गोष्टी पक्षात चालत नसतात, तुम्ही ताबडतोब पक्षाच्या माध्यमातून काम सुरू करा, असे सांगितले.

क्षणाचाही विचार न करता आम्ही दादांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन पक्षाच्या माध्यमातून काम करू लागलो. त्यावेळी १९९२ - ९३ मध्ये दादा आणि प्रा. रामकृष्ण मोरे सर हे दोघे जण महापौर आणि अन्य पदांबाबत निर्णय घ्यायचे. तेव्हा आझमभाई पानसरेंना महापौर केले. गटबाजीत न पडता कामातून या शहरात चांगले प्रकल्प कसे उभारता येतील, अशा विचाराने काम करणारा मी कार्यकर्ता होतो. अशा पद्धतीने काम करत राहिल्याने १९९३-९४ ला पवारसाहेब आणि दादांमुळे मला महापौरपदाची संधी मिळाली. माजी महापौर नानासाहेब शितोळे त्याचे साक्षीदार होते. मात्र, महापौरपदाच्या या निवडणुकीत पक्षातूनच बंडखोरी झाली. मधुकरअण्णा पवळे यांच्यावर दबाव टाकून त्यांना  माझ्या विरोधात उभे केले गेले. या निवडणुकीत सहा मतांनी मी विजयी झालो. माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला संधी मिळत असताना ही बंडखोरी झाली. परंतु, मी मनात काही न ठेवता सर्वांना बरोबर घेऊन काम करत राहिलो. आताचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हे त्यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष होते. तर, शेषप्पा नाटेकर उपमहापौर होते. पक्षनेते आदरणीय नानासाहेब शितोळे होते. पवारसाहेबांचे जवळचे सहकारी आणि नात्यापेक्षा मैत्री जपणारे नानासाहेब नेहमी चांगले मार्गदर्शन करत असत. दादांचे नेतृत्त्व तेव्हा नवे होते. पक्षवाढीसाठी त्यांनी येथे ताकद लावली पाहिजे, असे आम्ही अजितदादांना स्पष्टपणे सांगत असू.

संत तुकाराम महाराजांची पालखी शहराच्या निगडी प्रवेशद्वारावरून जाते. याचे महत्त्व लक्षात घेऊन, एक सांप्रदायिक जीवनाचा वारसा जपत असताना पवारसाहेबांच्या कामाला झालर लावण्याचे काम तुम्ही करणार आहात, असे मी महापौर असताना दादांना सांगितले व संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचे भक्ती-शक्ती शिल्प उभारण्याची विनंती केली. माझ्या विनंतीची दखल दादांनी घेतल्याने शहराची शान वाढविणारे भक्ती-शक्ती शिल्प तेथे आकाराला आले. त्यावेळी श्रीनिवास पाटील आयुक्त होते. पवारसाहेब मुख्यमंत्री होते. लांडेवाडी चौकातही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला.

लोकहितासाठीचे अनेक विकासप्रकल्प दादांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आले. त्यात जेएयूआरएमच्या माध्यमातून गरीबांसाठी गृहप्रकल्प, निगडी ओटास्कीम उभी राहिली, रस्ते, उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, उद्याने तयार झाली. नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी मोठी रुग्णालये तसेच इतरही लोकोपयोगी विविध प्रकल्प उभारण्यात आले. धडाडीने काम करणारा, रात्री-बेरात्री नागरिकांसाठी झटणारा नेता म्हणजे अजितदादा आहेत. मी कोणत्याही पदाची अपेक्षा केली नव्हती मात्र दादांनी माझ्या कुटुंबातील मी व माझी पत्नी मोहिनी आम्हा दोघांनाही महापौर केले, ही आमच्या प्रामाणिक कामाची पावती असल्याचे आम्ही मानतो.

मी आमदार असताना माझी पत्नी मोहिनी महापौर होती. त्यावेळी भोसरी उड्डाणपूल, अंकुश लांडगे नाट्यगृह, भोसरीतील शिवसृष्टी, अशा महत्त्वाच्या प्रकल्पांचे निर्णय घेऊन ते मार्गी लावले.  मागासवर्गीय मुला-मुलांसाठी वसतिगृह, अदिवासी मुला-मुलींचे वसतिगृह, भोसरी, दिघी, चिखली, तळवडे, एमआयडीसी भोसरी येथी नवीन पोलिस स्टेशन असे अनेक प्रकल्प तसेच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर संत ज्ञानेश्वर महाराज पादुका मंदिराजवळ संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या भेटीचे शिल्प प्रकल्प मंजूर करून पुढे सरकार दरबारी पाठवला होता, त्यांचे भूमिपूजनही आपण केले होते. परंतु, आजपर्यंतही तो प्रलंबितच आहे. तसेच लांडेवाडी चौकातील शिवसृष्टी येथील राजमाता जिजाऊ प्रवेशद्वाराचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबीत आहे. मागील सरकारने त्याकडे लक्ष दिलेले नाही. यात आता दादांनी लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त करतो.

त्याचप्रमाणे मिळकतधारकांचा शास्तीकर माफ करावा आणि अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा. या निर्णयामुळे या प्रश्‍नांसाठी माझ्यासह धडपड करणारे कै. दत्ताकाका साने यांना आदरांजली वाहिल्याचे सर्वांनाच समाधान मिळेल, अशी अजितदादांकडे त्यांच्या वाढदिवसानिमित्त मागणी आहे.

या शहरातील एकेका नेत्याला चार चार पदे मिळाली. ज्यांनी पक्ष सोडला त्यांनी पदे उपभोगून दादांची फसवणूक केली. गेल्या पाच वर्षांत राज्याची सत्ता भाजपकडे होती, अशा वेळी अजितदादा विरोधी नेते असताना त्यांची भूमिका समर्थपणे सांभाळत होते. त्यावेळी ही तथाकथित नेतेमंडळी त्यांच्यासमवेत नव्हती. याचे शल्य दादांच्या मनात कायम राहिले आहे. गेली ३० ते ३५ वर्षे मी अजितदादांसमवेत काम करत असताना या गोष्टी मी पाहिल्या आहेत. त्यामुळे भविष्यात दादांनी आता खऱ्या कार्यकर्त्यांना ताकद देणे गरजेचे आहे, असे माझे मत आहे. दादांच्या पुढेमागे करून ज्यांनी पदे उपोभोगली त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. पवारसाहेब अणि अजितदादा यांनी पिंपरी-चिंचवड शहरासाठी बरेच कष्ट केले आहेत.

लोकसभेत उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळवणाऱ्या सुप्रिया सुळे याही देशाच्या राजकारणात उत्तम प्रकारे काम करत आहेत. विचाराला दिशा देणारे जयंत पाटलांसारखे प्रदेशाध्यक्ष पक्षाला लाभलेले आहेत. आगामी २०२२ च्या निवडणुकीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी सर्वांनी नियोजनपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. सध्या महानगरपालिकेत बेधुंद कारभार सुरू आहे. त्यावर वचक ठेवण्याची आवश्‍यकता आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या निवडणुकीत अजितदादांच्या नेतृत्वाखाली विजय संपादन करण्यासाठी नागरिकांना तसेच छोट्या कार्यकर्त्यांनाही विश्‍वास देणे गरजेचे आहे. दादांनी त्यांच्या कामाच्या विशिष्ट शैलीतून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. आजवर निव्वळ वयक्तिक स्वार्थासाठी काम करणाऱ्या व सत्तेसाठी मागे पुढे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण ओळखावे. प्रामाणिक कार्यकर्त्यांना ताकद द्यावी. आपल्या सोबत आपल्या ध्येयधोरणांबाबत आपल्या विचारसरणीसोबत आम्ही कायम एकनिष्ट राहिलो आहोत. आपणही कुटुंबातील सदस्याप्रमाणे आमच्यावर प्रेम केले आहे. राजकीय सामाजिक जीवनातील अनेक चढउतारांचे आपण साक्षीदार आहात.

आपल्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना पिंपरी, चिंचवड, भोसरी भागात जी कामे करता आली यांचे सर्वस्वी श्रेय आपले आहे. नगरसेवक, महापौर, आमदार म्हणून जे काही चांगले काम करता आले त्याबद्दल आपण नेहमी कौतुक केले आहे. तसेच त्या त्या परिस्थितीत घेतलेल्या काही निर्णयांसाठी राग व्यक्त करण्याचाही अधिकार आपल्याला आहे. पण आजवर केलेले काम व घेतलेले निर्णय यात नेहमी पक्षाची व आपली प्रतिमा जपण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढेही आपल्या मार्गदर्शनाखाली एकनिष्ठ जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांचा व तरुणांची सांगड घालून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्याचा माणस आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून पुन्हा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर आपलीच सत्ता असेल याची खात्री आहे. उगवत्या सुर्याला नमस्कार करणाऱ्यांची येथे कमी नाही. आपल्या मदतीने पदे उपभोगून कित्येकजण सत्तेसाठी भाजपमध्ये गेले. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. सत्तेविना राहण्याची सवय नसणारे बहाद्दर आता पुन्हा आपल्याकडे येतील.

यावेळी जुन्या एकनिष्ठ व आपल्या सोबत काम करणाऱ्यांना न्याय द्यायचा की त्यांनाच पवित्र करून पुन्हा संधी द्यायची याचा निर्णय आता तुम्हाला घ्यायचा आहे. आपल्याला स्पष्ट बोललेले आवडते. आपणही स्पष्ट वक्ते आहात. सामान्य कार्यकर्त्याच्या मनातील भूमिका मी नम्रपणे आपल्यासमोर मांडत आहे. आपण रात्रंदिवस कष्ट करून स्वतः जातीने लक्ष घालून पिंपरीचिंचवड महानगरपालिकेच्या गुणवत्तापूर्ण कामाचा आलेख देशभर उंचावला. कार्यकर्त्यांना ताकद दिली. अनेक नेते घडविले. यापुढेही आपण स्वतः जातीने लक्ष घालून एकनिष्ठ कार्यकर्त्यांना ताकद द्याल असा विश्‍वास मला आहे. महापालिकेत पुन्हा सत्ता आणण्यासाठी जुन्या जाणत्या आणि नवीन तरुण कार्यकर्त्यांनी हातात हात घालून काम केले पाहिजे. संघटनात्मक काम करत असताना अन्य पक्षाशी हातमिळवणी करत भ्रष्टाचार करणाऱ्या अशा कोणत्याही कार्यकर्त्याला दादांनी जवळ घेऊ नये. प्रामाणिक कार्यकर्त्याला ताकद द्यावी.

पक्षवाढीसाठीचे प्रामाणिक व भरीव काम ही दादांना वाढदिवसाची गिफ्ट असेल, अशी भावना मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त व्यक्त करतो. आम्ही लांडे कुटुंबीय दादांशी कायम जोडलेलो आहोत. साहेब आणि दादांनी मला घरच्यासारखे सांभाळले आहे. राजकारणात दिलेल्या पदांपेक्षा त्यांचे प्रेम मला खूप महत्वाचे वाटते.  दादा आणि त्यांचे काम यामुळे ते भविष्यात खूप मोठी उंची गाठणार आहेत.  दादा आपणास उदंड व निरोगी आयुष्य लाभो ही ईश्‍वरचरणी प्रार्थना.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com