
पिंपरी : पिंपळे सौदागर येथील विराज जगताप या तरुणाच्या खून प्रकरणात काही समाजकंटक जाणिवपूर्वक जातीय तेढ निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओ प्रसारित करत आहेत. या प्रकरणी कोणीही चुकीची पोस्ट, अफवा पसरवू नयेत, जातीय तेढ निर्माण करू नये, असे आवाहन विराज जगताप याच्या कुटुंबियांनी तसेच पिंपळे सौदागर ग्रामस्थांनी केले आहे.
विराज याचा 7 जूनला खून झाला. याप्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली असून, कायदेशीर कारवाई सुरू आहे. मात्र, काही समाजकंटकानी या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ तसेच अफवा प्रसारित केल्या जात आहे. पोलिसांनी देखील अशा प्रकारे जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, पिंपळे सौदागर परिसर तसेच शहरात सामाजिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेत रविवारी जगताप कुटुंबियांसोबत याप्रकरणी चर्चा केली. यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, उद्योजक संदीप काटे तसेच स्थानिक मंडळी हजर होते. यावेळी विराजच्या आजी असलेल्या माजी नगरसेविका सुभद्राताई जगताप, चुलते विजय जगताप तसेच इतर नातेवाईक उपस्थित होते.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
यावेळी सुभद्राताई जगताप म्हणाल्या, "कधी घडू नये असा प्रकार हा घडला आहे. पूर्वीपासून आमच्या कुटूंबांचे आणि गावाचे चांगले संबंध आहेत. आज चारही नगरसेवक आमच्या सोबत आहेत. विराजच्या प्रकरणात कोणीही गावावर चिखलफेक करू नये, अफवा पसरवू नये. माझा नातू गेला आहे, या प्रकरणात जो गुन्हेगार असेल त्यालाच शिक्षा झाली पाहिजे. बाकी गावाला कुणी दोषी ठरवू नका, गावाने मला आत्तापर्यंत सहकार्यच केले आहे."
विजय जगताप म्हणाले, "या प्रकरणात सध्या सोशल मिडीयावर महिलांबद्दल अपशब्द वापरले जात आहेत. ही अत्यंत घृणास्पद बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांचा सन्मान करण्याचीच शिकवण आपल्याला दिली आहे. यापुढे कोणीच महिलांबद्दल सोशल मिडीयावर पोस्ट टाकू नयेत. जातीय तेढ निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नये."
नाना काटे म्हणाले, "विराजच्या घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पिंपळे सौदागरमध्ये आजपर्यंत कधीच जातीयवाद झालेला नाही. जगताप परिवारासोबत सर्वच ग्रामस्थांचा चांगला सलोखा आहे. याभागात भीमजयंती, शिवजयंती असे अनेक सण एकत्र येऊनच साजरे होतात. जाणिवपूर्वक इथे दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करत आहेत. कृपया कोणीही अफवा पसरवू नका शांतता व सुव्यवस्था राखावी. आम्ही सर्व ग्रामस्थ जगताप कुटूंबांच्या दुखा:त सहभागी आहोत."
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शत्रुघ्न काटे म्हणाले, "विराज जगताप याला समस्त पिंपळे सौदागरच्यावतीने श्रध्दांजली वाहतो. अत्यंत दुदैवी घटना घडली आहे. मात्र काही लोक या प्रकरणात जातीय रंग देत आहेत. आपण शाहु, फुले, आंबेडकरांच्या राज्यात आहोत. सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुली, महिलांबद्दल चुकीचे पोस्ट तसेच अपशब्द पसरविले जात आहेत. कृपया कोणीच समाजातील जातीय सलोखा बिघडविण्यासाठी खोडसाळपणे प्रक्षोभक, आक्षेपार्ह, चिथावणीखोर पोस्ट, व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकू नये."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.