वाघोली पाणी योजना पर्याय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wagholi water scheme options

वाघोली पाणी योजना पर्याय

पिंपरी : वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजना ३० एमएलडी कोट्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे हस्तांतरित केल्यास २८ दशलक्ष लिटर प्रति दिन पाणी उपलब्ध होऊन चऱ्होली, मोशी, डुडुळगाव, दिघी या झपाट्याने विकसित होणाऱ्या भागासह शहरातील सर्व भागातील पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा होण्यास मदत होईल. त्यामुळे ही योजना महापालिकेकडे हस्तांतरित करावी. आणि प्रकल्पाची देखभाल दुरुस्ती महापालिका करेल असा एक मतप्रवाह तयार होत आहे.

शहराची लोकसंख्या सुमारे २८ लाख आहे. सद्यःस्थितीत शहरासाठी पवना नदीतून सुमारे ५०० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलले जाते. लोकसंख्या व उंचसखल असलेली भौगोलिक परिस्थिती यामुळे पाणी पुरवठ्याबाबत तक्रारी मोठया प्रमाणात आहेत. त्यामुळे साहजिकच शहराला वाढीव पाण्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र, वाढीव पाणी कोटा मिळण्यासाठी नजीकचा भविष्यात कोणताही स्रोत उपलब्ध नाही, यामुळे वाघोलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

पुणे महापालिकेकडील भामा-आसखेड योजना कार्यान्वित झाली असून, त्यामधून त्यांना २०० एमएलडी प्रतिदिन इतका वाढीव पाणीपुरवठा सुरू झालेला आहे. शिवाय वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पवना नदीतून ३० एमएलडी प्रतिदिन इतके पाणी घेतले जात जाते. वाघोली योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र मौजे चिखली येथे असून तेथून वाघोली परिसराला पाणीपुरवठा केला जातो. पुणे शहराला सध्या खडकवासला, वरसगाव, टेमगाव, पानशेत, भामा भासखेड या धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेस सध्या फक्त पवना नदीतून ५०० एमएलडी प्रति दिन पाणी देण्यात येत असून, आंद्रा व भामा आसखेड धरणातून २६० एमएलडी पाणी कोटा मंजूर आहे.

वीज समस्येमुळेही अनेक भागांत पाणीटंचाई

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत बंधारा येथून अशुद्ध जलउपसा होतो. त्यासाठी २० पंप असून, तेथून पाइपलाइनद्वारे निगडी प्राधिकरण येथील सेक्टर २३ मधील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी नेले जाते. रावेत बंधारा व निगडी जलशुद्धीकरण केंद्र या दोन्ही ठिकाणी स्वतंत्र वीजपुरवठा आहे. त्यामुळे एका ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला तरी शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. त्यामुळे पाणी पुरवठ्याशी संबंधित वीज यंत्रणा सक्षम करण्याची आवश्यकता आहे. महावितरण आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत ठोस कार्यवाही करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

सोसायट्यांतील कूपनलिका कोरड्या

पिंपळे सौदागर परिसरातील बहुतांश गृहनिर्माण सोसायट्यांमधील कूपनलिका वाढत्या तापमानामुळे कोरड्या पडू लागल्या आहेत. त्यांच्यावर टँकरवरील खर्चाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. यातच कुणाल आयकॉन रस्ता परिसरात नव्याने बांधलेल्या वीस लाख लिटर क्षमतेच्या टाकीमधून पाणीपुरवठा कधी होणार? असा सवाल नागरिकांचा आहे. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांचा हा परिसर उच्चभ्रू म्हणून ओळखला जातो. सौदागर गावठाण, काटे वस्ती परिसर, कुणाल आयकॉन परिसर, रोझवूड आदी परिसरात कमी दाबाने दिवसाआड पाणीपुरवठा होतो.

आमच्या सोसायटीला साडेतीन लाख लिटर पाणी लागते. कूपनलिकांचे पाणी कमी झाले आहे. यात पाच कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. सध्या टॅंकरने गरज भागवली जात आहे.

-विनोद सुर्वे, अध्यक्ष, कुणाल आयकॉन सोसायटी

आमच्या रोझलॅंड सोसायटीमध्ये रेन हार्वेस्टिंग आहे, तरीही पाणी पातळी खालावल्याने टंचाई झाली आहे. यासाठी आम्ही अंतर्गत गळती रोखणे, पाण्याचा अपव्यय टाळून काटकसर करणे, यासाठी सोसायटी घराघरांमधून पाणी वापराबाबत मोहीम सुरू केली आहे.

-संतोष मस्कर, अध्यक्ष, रोझलॅंड सोसायटी

स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत रस्त्याचे काम सुरू आहेत. नवीन टाकीमधून पाणीपुरवठा होण्यासाठी किमान एक ते दीड महिन्याचा अवधी लागेल.

- अजय सूर्यवंशी, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

Web Title: Wagholi Water Scheme Options Idea Classifying Plan Streamline City Water Supply

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top