तळेगावात गटाराचे पाणी सोसायटीत;यशवंतनगरमधील सांडपाण्याचा प्रश्न गंभीर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 December 2020

नवीन गृहप्रकल्पांना परवानग्या अथवा पूर्णत्व प्रमाणपत्र देताना नगरपरिषदेने शहानिशा न केल्यामुळे सांडपाण्याच्या विल्हेवाटीचा गंभीर प्रश्न तळेगावातील उपनगरांमध्ये निर्माण झाला आहे.

तळेगाव स्टेशन - यशवंतनगरमधील तपोधाम कॉलनीतील वराळे रस्त्याकडेला गटाराचे तुंबलेले पाणी सोसायटीच्या आवारात शिरले आहे. त्यामुळे रहिवाशांना गटाराच्या पाण्यातून ये-जा करावी लागत आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नवीन गृहप्रकल्पांना परवानग्या अथवा पूर्णत्व प्रमाणपत्र देताना नगरपरिषदेने शहानिशा न केल्यामुळे सांडपाण्याच्या विल्हेवाटीचा गंभीर प्रश्न तळेगावातील उपनगरांमध्ये निर्माण झाला आहे. गृहप्रकल्प अथवा व्यापारी संकुलांची बांधकामे करताना काही बिल्डरांनी नैसर्गिक ओढे बुजविण्याबरोबरच गटारांचे प्रवाहही खंडित केले आहेत. यशवंतनगरमधील प्रतीकनगरसह इतर काही सोसायट्यांच्या सांडपाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वराळे रस्त्याकडेला स्टेट बॅंकेच्या एटीएमसमोर, आयकॉनिक सोसायटीच्या मागील बाजूस गटाराच्या तुंबलेल्या पाण्याच्या समस्येवर नगरपरिषदेला तोडगा काढता आलेला नाही. गेल्या आठवड्यापासून गटाराचे तुंबलेले पाणी संगीता पार्क आणि रत्नप्रभा सोसायटीच्या आवारात शिरल्यामुळे येथील रहिवाशांना गटारातून मार्गक्रमण करीत ये-जा करावी लागत आहे. याबाबत नगरपरिषदेचा आरोग्य विभाग आणि बांधकाम विभागामध्ये "तू तू मैं मैं' चालू आहे. याबाबत वारंवार निवेदने विनंत्या करूनही समस्या निवारण होत नसल्याचे संगीता पार्क सोसायटीतील रहिवासी चंद्रकांत सावंत व प्रकाश ठाकूर यांनी सांगितले. नगरपरिषद बांधकाम विभाग आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. नगरपरिषद प्रशासनाने दोषी बांधकाम विकसकांच्या खर्चाने यशवंतनगरमधील रहिवासी सोसायट्यांच्या सांडपाण्याच्या प्रलंबित प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढवा, अशी मागणी रत्नप्रभा सोसायटीतील रहिवासी प्रफुल्ल करावडे यांनी केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

प्रतीकनगर सोसायटीचे सांडपाणी शंकराच्या मंदिराकडे वळविण्याचा निर्णय होऊनही ढिम्म नगरपरिषद प्रशासनाकडून दोन महिन्यांपासून नुसते सर्वेक्षणच चालू आहे. आठवडाभरात नगरपरिषदेने योग्य ती उपाययोजना न केल्यास आम्ही सर्व रहिवासी याच गटाराचे पाणी थेट नगरपरिषदेच्या आवारात आणून ओतणार आहोत. 
- प्रकाश वाळूंजकर, स्थानिक रहिवासी, संगीता पार्क सोसायटी 

अस्तित्वातील गटारांचे प्रवाह खंडित करणाऱ्या बांधकामाला परवानगी देताना नगरपरिषदेने शहानिशा केलेली दिसत नाही. याच चुकांची पुनरावृत्ती प्रशासन पुन्हा करत असल्यामुळे सांडपाण्याच्या विल्हेवाटीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 
- निखिल भगत, नगरसेवक 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: waste water issue in Yashwantnagar