Water Lake : भोसरी एमआयडीसीतील रस्त्यावर पावसाच्या पाण्याचे तळे

भोसरी एमआयडीसीतील जे-ब्लॉकमधील डब्ल्यू १६९/ए समोरील रस्त्यावर पाऊस पडून दहा दिवस उलटल्यानंतरही रस्त्यावर दोन फुटापर्यंत पाणी साचल्याने लघुउद्योजकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
Water lake in Bhosari
Water lake in Bhosarisakal

भोसरी - भोसरी एमआयडीसीतील जे-ब्लॉकमधील डब्ल्यू १६९/ए समोरील रस्त्यावर पाऊस पडून दहा दिवस उलटल्यानंतरही रस्त्यावर दोन फुटापर्यंत पाणी साचल्याने लघुउद्योजकांच्या अडचणी वाढल्या आहेत. पाण्यात पडून काही कामगारही जखमी झाले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून अशी स्थिती असतानाही पिंपरी-चिंचवड महापालिका याकडे लक्ष घालत नसल्याने लघुउद्योजकांनी संताप व्यक्त केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात २९ मे रोजी मुसळधार अवकाळी पाऊस झाला होता. त्यावेळी भोसरी एमआयडीसीतील जे ब्लॉकमधील डब्ल्यू १६९/ए समोरील रस्त्यावर चार फुटापर्यंत पाणी साचले होते. मात्र पावसाच्या पाण्याला निचरा होण्यासाठीचा मार्ग नसल्याने पाऊस होऊन दहा दिवस उलटले तरीही या रस्त्यावर दोन फुटापर्यंत पाणी साचले आहे. त्यामुळे या परिसरात असलेल्या वीस कंपन्यांना याचा फटका बसत आहे.

गेल्या दहा दिवसांपासून येथे पाणी साचून राहिल्याने पाण्याला दुर्गंधी येण्यास सुरवात झाल्याचे लघुउद्योजक तुकाराम बांगर यांनी सांगितले. तर साचलेल्या पाण्यामुळे कुरिअरवाले त्यांच्या कार्यालयातून कुरिअरचे पार्सल घेऊन जाण्यास सांगत असल्याचे प्रभाकर सावंत यांचे म्हणणे आहे. परिसरातील कंपन्यांमध्ये कामाला जाणाऱ्यांना दीड-दोन किलोमीटरचा वळसा मारून जावे लागत असल्याची माहिती ठेकेदार शेखर ठाकूर यांनी दिली. पावसाचे पाणी कंपनीत शिरत असल्याने लघुउद्योजक निरज मुनोत यांच्यासह इतरांनी संताप व्यक्त केला आहे.

कंपनीसमोरील पावसाचे पाणी बाहेर सोडण्यासाठी पस्तीस हजार रुपये खर्च करून पाण्याची मोटार घ्यावी लागली. दोन दिवस मोटार लावून पाण्याचा निचरा केला. मात्र आता पाण्याबरोबर गाळही राहिला असल्याने पाण्याचा निचरा करता येत नाही.

- भानुदास तोडकर, लघुउद्योजक

पाण्यात पडून कंपनीतील दोन कामगार जखमी झाले आहेत. त्याचप्रमाणे पावसाच्या पाण्यात दुचाकी घसरूनही काहींना इजा झाली आहे. चार चाकी वाहने पाण्यात बंद पडून त्यांचे नुकसानही झाले आहे.

- रोहीत गुजराती, लघुउद्योजक

या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा असणारा प्लॉट भोसरी एमआयडीसीने विकला आहे. जागा मालकाने प्लॉटवर भिंत बांधल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी येथे जागाच उपलब्ध नाही. साचत असलेल्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी येथे स्टॉर्म वाटर लाइन टाकणे गरजेचे आहे. मात्र सध्या तरी महापालिकेने यासाठी आर्थिक तरतूद केलेली नाही.

- संजय माने, उपअभियंता, क प्रभाग स्थापत्य विभाग.

लहान मुलांचे पोहणे धोकादायक

या ठिकाणी साचलेल्या पाण्यात परिसरातील लहान मुले पोहण्यासाठी येतात. मात्र हा वर्दळीचा रस्ता असल्याने रस्त्याने येणाऱ्या एखाद्या वाहन चालकांच्या लक्षात पोहणारी मुले आली नाही तर मोठी दुर्घटना होण्याचीही शक्यता आहे. या मुलांना हुसकावून लावल्यानंतरही ही मुले पुन्हा पोहण्यासाठी येथे येत असल्याचे लघुउद्योजकांनी सांगितले.

Water lake in Bhosari
Women Strike : व्यावसायिक बांधकामावर कारवाई; राडारोडा उचलण्याच्या मागणीसाठी महिलेचे बेमुदत उपोषण

खोदलेल्या रस्त्यांतही पाणी

सिमेंट काँक्रीटचा रस्ता करण्यासाठी भोसरी एमआयडीसीतील काही भागातील रस्ते महापालिकेने खोदले आहेत. खोदलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्यानेही लघुउद्योजकांच्या अडचणी वाढल्या आहेत. यामुळे लघुउद्योजकांना कच्चा माल आणणे व तयार माल कंपनीतून बाहेर नेणे अवघड होऊन बसले आहे. लघुउद्योजकांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी या समस्या तातडीने सोडविण्याची मागणी लघुउद्योजक, माजी नगरसेवक संजय वाबळे यांनी केली आहे.

लघुउद्योजकांना पावसाची धास्ती

अद्याप पावसाळ्याला सुरुवात झालेली नाही. तरीही अवकाळी पडलेल्या पावसाच्या पाण्याचा दहा दिवसानंतरही निचरा होऊ शकला नाही. त्यामुळे पावसाळा सुरू झाल्यानंतर पाण्याचा निचरा झाला नाही, तर कंपनीतही पाणी शिरेल, त्याचप्रमाणे पाण्यामुळे कामगारांनाही कंपनीत येणे-जाणे अवघड होणार असल्याने कंपन्या बंद ठेवावी लागण्याची भिती काही लघुउद्योजकांनी बोलून दाखविली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com