गणेश मूर्तींचे विसर्जन कुठं करायचं? शिवसेनेचा सवाल

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 August 2020

  • महापालिकेसमोर आंदोलन
  • अधिकाऱ्यांकडे मूर्ती सुपूर्द 

पिंपरी : कोरोना परिस्थितीची जाणीव असतानाही महापालिकेने गणेश मूर्ती विसर्जनाची कोणतीही सोय केली नाही. त्याविरोधात शिवसेनेने सोमवारी (ता. 24) महापालिका मुख्यालयाच्या आवारात आंदोलन केले. दान घेतलेल्या मूर्ती विसर्जनासाठी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मुळा, पवना व इंद्रायणी नद्यांचे विसर्जन घाट व पूर्वी बांधलेल्या हौदांत मूर्ती विसर्जन करण्यास महापालिकेने बंदी घातली आहे. तसेच, शहरात फिरत्या हौदांची कोठेही व्यवस्था केली नाही, मूर्तिदान उपक्रमाचे ढिसाळ नियोजन आहे, यामुळे विसर्जन कुठे करायचे? असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला. जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, महिला संघटिका ऊर्मिला काळभोर, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, विश्‍वजित बारणे, सरिता साने आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे महापालिकेने विसर्जनासाठी फिरते हौद केले आहेत. मूर्तीदान उपक्रम राबविला जात आहे. पण, महापालिकेने कोणतीही व्यवस्था केली नाही. प्रशासन केवळ निविदा प्रक्रियेत गुंतले आहे, असा आरोप खासदार श्रीरंग बारणे यांनी केला. चिंचवडे म्हणाले, "महापालिकेने गणेशोत्सावकडे अक्षम्य पद्धतीने दुर्लक्ष केले आहे. मूर्ती विसर्जनाबाबत कोणतेही नियोजन नाही. यामुळे दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करताना नागरिकांची गैरसोय झाली. मूर्तीदानासाठी स्वयंसेवी संस्थांची माहिती प्रशासनाकडून मिळत नाही. हा भाविकांच्या भावनांशी खेळ आहे.'' मूर्तीदानाबाबत प्रभागनिहाय महापालिकेचे नियोजन व अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या जाहीर करण्याचे आश्‍वासन अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी शिष्टमंडळाला दिल्याचेही चिंचवडे यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: where to immerse ganesh idols shivsena's question in pimpri chinchwad