लॉकडाउन तळेगाव दाभाडेत लागू असेल की नाही? वाचा सविस्तर...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 July 2020

तळेगाव आणि एमआयडीसी पोलिस ठाणे, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत येत असल्यामुळे लॉकडाउन हा तळेगाव दाभाडे हद्दीत लागू असेल की नाही? या बाबत सोशल मीडियावर शनिवारपासूनच तर्क-वितर्कांना उधाण आले.

तळेगाव स्टेशन (पुणे) : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत समावेश असल्याने सोमवारी मध्यरात्रीपासून जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनबाबत गोंधळलेल्या तळेगावकरांनी रविवारी (ता. १२) जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी गर्दी केल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. अद्यापही आदेश न आल्याने तळेगावकर संभ्रमावस्थेतच आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि आयुक्तालयाच्या कार्यकक्षेत सोमवारपासून पुढी दहा दिवस संपूर्ण लॉकडाउन जाहीर केला. तळेगाव आणि एमआयडीसी पोलिस ठाणे, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत येत असल्यामुळे लॉकडाउन हा तळेगाव दाभाडे हद्दीत लागू असेल की नाही? या बाबत सोशल मीडियावर शनिवारपासूनच तर्क-वितर्कांना उधाण आले.

लॉकडाउन काळात पिंपरी-चिंचवडमध्ये काय सुरू, काय बंद? वाचा सविस्तर

तळेगावात लॉकडाउनची शक्यता गृहीत धरून रविवारी नागरिकांनी किराणामाल, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी तोबा गर्दी केली. याचाच फायदा बहुतांश व्यावसायिक, विक्रेते आणि व्यापाऱ्यांनी चढ्या दराने माल विक्री करत हात धुऊन घेतले. रविवारी तळेगावात टोमॅटो शंभर रुपये किलो, कांदा चाळीस रुपये, तर मेथीची जुडी तीस रुपये आणि इतर भाजीपाला दीडपटीपेक्षा अधिक भावाने विकला केला.

बऱ्याच किराणा व्यापाऱ्यांचा माल संपला. दहा दिवसांच्या लॉकडाउनमध्ये गैरसोय होऊ नये म्हणून नागरिकांनी पिठाच्या गिरणीसमोर दळणासाठी रांगा लावल्या. एरव्ही पाच किलो धान्य दळण्यासाठी आणणारे नागरिक २०-३० किलोची गाठोडी घेऊन गिरणीत आले. त्यामुळे गिरणीचालकांची धांदल उडाली. परिणामी तळेगावात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालयाचे चित्र रविवारी दिवसभर पहावयास मिळाले. मात्र, प्रशासकीय दृष्टीने तळेगावला लागू होत असलेला जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रविवारी रात्रीपर्यंत आला नसल्यामुळे नगरपरिषद प्रशासनदेखील या बाबत साशंकच राहीले. नगरपरिषद आणि पोलिस अधिकाऱ्यांना या बाबत खुलासा करण्यासाठी प्रश्नांचा भडीमार चालू राहीला. सोशल मीडियासह फोनवर प्रश्न विचारून नागरिकांनी प्रशासनाला अक्षरशः भंडावून सोडले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

व्यापारी असोसिएशनने नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत लॉकडाउनला विरोध दर्शविला. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी दिलेली माहिती स्पष्ट असून, त्यानुसार तळेगाव, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तलयाच्या कार्यकक्षेत असल्याने तळेगावात लॉकडाउन राहीलच. परंतु, या बाबत सविस्तर लेखी आदेश अद्याप प्राप्त झाले नसल्याचे मुख्याधिकारी दिपक झिंजाड यांनी सांगितले. सोमवारी दुपारपर्यंत तळेगावात लॉकडाउन लागू असेल की नसेल? या बाबत संभ्रम कायम होता. नगरपरिषद प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून या बाबत परिपत्रक काढून काय तो निर्णय एकदाचा जाहीर करावा, अशी गोंधळलेल्या नागरिकांची मागणी आहे.

Edited by : Shivnandan Baviskar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: whether there is a lockdown at Talegaon Dabhade