शिष्यवृत्ती निकाल रखडलेला असताना, पुढील वर्षाची तारीख जाहीर

आशा साळवी 
Sunday, 8 November 2020

दरवर्षी जून महिन्यात शिष्यवृत्ती निकाल जाहीर केले जातात, मात्र परीक्षा परिषदेला अद्याप निकाल जाहीर करता आलेला नाही. यावर्षी लॉकडाउनमुळे निकालाचे काम करता आले नसल्याची पुष्टी परिषदेने दिली होती.

पिंपरी : गेल्या नऊ महिन्यांपासून शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल रखडलेला असताना, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने मात्र पुढील वर्षाच्या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. परिणामी परिषदेचा 'पुढच पाठ, मागचं सपाट' या म्हणीप्रमाणे कारभार चालला आहे. अजून किती महिने निकालाची वाट पाहायची? असा प्रश्‍न पालक अमोल नवलपुरे यांनी केला आहे. परिणामी शिष्यवृत्ती रक्कमदेखील पुढच्या वर्षी मिळणार आहे. त्यांच्याप्रमाणेच शहरातील साडे हजार बारा हजार पालकांनाही हा प्रश्‍न सतावत आहे.

हे ही वाचा : कोरोनामुळे यंदाचा पुलोत्सव रद्द

परिषदेकडून 16 फेब्रुवारीला परीक्षा घेण्यात आली होती. यंदा शहरातील 12 हजार 724 विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती दिली. यामध्ये पाचवीमधील 7 हजार 946 विद्यार्थी तर आठवीचे 4 हजार 778 परीक्षार्थी होते. पण या महिन्यात निकाल लागेल, असे म्हणत म्हणत नोव्हेंबर महिना उजाडला. तरी शिष्यवृत्तीचा निकाल रखडलेलाच आहे. शिष्यवृत्ती परीक्षेनंतर दहावी व बारावीच्या परीक्षांचा निकाल थोड्याफार फरकाने उशिरा का होईना लागला. 

या परीक्षेच्या वेळीच कोरोनाने थैमान घातले होते, तरीदेखील राज्य मंडळाकडून बोर्डाच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले. दरवर्षी जून महिन्यात शिष्यवृत्ती निकाल जाहीर केले जातात, मात्र परीक्षा परिषदेला अद्याप निकाल जाहीर करता आलेला नाही. यावर्षी लॉकडाउनमुळे निकालाचे काम करता आले नसल्याची पुष्टी परिषदेने दिली होती.

हे ही वाचा : 'एवढ्या' रकमेची विकासकामे निधीअभावी शहरात होऊ शकलेली नाहीत

दरम्यान, परिषदेने नऊ ऑक्‍टोबर रोजी अंतिम निकाल जाहीर करून पालकांकडून आक्षेप व हरकती मागविल्या होत्या. आता एक महिना उजाडला तरी निकाल अद्याप गुलदस्त्यातच असतानाच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पूर्व उच्चप्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी 2020-21 फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी ऐवजी एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी घेण्यास मान्यता दिलेली आहे. त्यानुसार परीक्षा परिषदेमार्फत या परीक्षा एप्रिल महिन्याच्या चौथ्या रविवारी घेण्याचे प्रस्तावित असून परीक्षेची अधिसूचना लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, परिषदेचे अध्यक्ष तुकाराम तुपे यांनी सांगितले आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: While the final results of the scholarship examination have been delayed for the last nine months the Maharashtra State Examination Council has announced the date for next years examination