पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन आयुक्त कोण?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 December 2020

नाताळ व विकेएंडमुळे महापालिकेला सलग तीन दिवस सुटी होती. त्याला जोडून महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर रजेवर गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या बदलीची व नवीन आयुक्त कोण येणार? याचीच चर्चा गेल्या दोन दिवसांपासून महापालिका वर्तुळात सुरू आहे.

पिंपरी - नाताळ व विकेएंडमुळे महापालिकेला सलग तीन दिवस सुटी होती. त्याला जोडून महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर रजेवर गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या बदलीची व नवीन आयुक्त कोण येणार? याचीच चर्चा गेल्या दोन दिवसांपासून महापालिका वर्तुळात सुरू आहे. विशेष म्हणजे, अतिरिक्त आयुक्तांची दोन पदेही सध्या रिक्त असल्याने त्या पदांवर कोण विराजमान होणार, याचीही चर्चा सुरू आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिका आयुक्तपदाची सुत्रे हर्डीकर यांनी 27 एप्रिल 2017 रोजी स्वीकारली. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाल गेल्या 27 एप्रिल रोजीच पूर्ण झाला आहे. मात्र, कोरोनाच्या कालावधीमुळे त्यांना मुदतवाढ मिळाली. त्याला आता आठ महिन्यांचा कालावधी उलटला आहे. शिवाय, येत्या एक जानेवारी रोजी प्रशासकीय सेवेची 16 वर्षेही ते पूर्ण करीत आहेत. त्यामुळे त्यांना सचिवपदी बढती मिळण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, नाताळला जोडून शनिवार व रविवार आल्याने तीन दिवस महापालिकेला सुटी होती. त्याला जोडूनच आयुक्त रजेवर गेले आहेत. त्यांच्याकडील कामकाजाचा पदभार अतिरिक्त आयुक्त (दोन) अजित पवार यांच्याकडे सोपविला आहे. त्यामुळे आयुक्त हर्डीकर यांची बढती व बदली एकाच वेळी होईल, यांसह त्यांच्या जागी कोण आयुक्त येईल, याची चर्चा कर्मचारी, अधिकारी व पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे. 

दुकानदार आणि जागरूक नागरिकांनी आपल्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत

अतिरिक्त आयुक्तपदे रिक्त 
अतिरिक्त आयुक्त (एक) संतोष पाटील यांची गेल्या आठवड्यात विभागीय आयुक्त कार्यालयात बदली झाली आहे. तसेच, अतिरिक्त आयुक्तपदाचा (तीन) कारभार पाहणारे प्रविण तुपे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्यामुळे दोन्ही पदे रिक्त आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांसह आयुक्त हर्डीकर यांच्याकडील कारभारही अतिरिक्त आयुक्त (दोन) अजित पवार यांच्याकडे आहे. काही दिवसांत त्यांनाही बढती मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे तेही बदली व बढतीच्या "मुळ'मध्ये आहेत. त्यामुळे आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्तपदी कोण? याची चर्चा ऐकायला मिळत आहे. 

महापालिका सेवेतील कोण? 
दरम्यान, महापालिकेच्या नव्या आकृतीबंधात मंजूर तीन अतिरिक्त आयुक्तांपैकी दोन शासकीय सेवेतील व एक महापालिका सेवेतील अधिकारी असेल, असे नमूद आहे. त्यामुळे तुपे यांच्या जागी महापालिका सेवेतील तीन अधिकाऱ्यांची नावे सध्या चर्चेत आहेत. त्यापैकी कोणाची वर्णी लागते? हे आगामी काळातच उघड होणार आहे.

 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who is the new commissioner in Pimpri Chinchwad