प्रशासनाच्या चुकीची शिक्षा सोसायटीधारकांना का?; आमदार लांडगे यांचा महापालिका आयुक्तांना सवाल 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

गृहप्रकल्पांमध्ये निर्माण होणारा ओला कचरा जिरवणे आणि प्रक्रिया प्रकल्प उभारणे बंधनकारक असताना अनेक बांधकाम व्यावसायिकांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. तसेच, महापालिका प्रशासनानेही संबंधितांना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला डोळेझाकपणे दिला आहे.

पिंपरी : गृहप्रकल्पांमध्ये निर्माण होणारा ओला कचरा जिरवणे आणि प्रक्रिया प्रकल्प उभारणे बंधनकारक असताना अनेक बांधकाम व्यावसायिकांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. तसेच, महापालिका प्रशासनानेही संबंधितांना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला डोळेझाकपणे दिला आहे. मात्र, प्रशासन- बांधकाम व्यावसायिकांच्या चुकीची शिक्षा सोसायटीधारकांना का? असा प्रश्‍न भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केला आहे. चिखली- मोशी- चऱ्होली हाउसिंग सोसायटी फेडरेशनच्या मागणीनुसार, आमदार लांडगे यांच्या उपस्थितीत सोसायट्यांमधील कचरा समस्येबाबत मंगळवारी बैठक झाली. महापालिका आयुक्त हर्डीकर, फेडरेशनचे सचिव संजीवन सांगळे आदी उपस्थित होते.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सोसायट्यांची मागणी 
शहरातील अनेक बांधकाम व्यावसायिकांनी महापालिका नियमानुसार, गृहप्रकल्पामध्ये सोसायटीधारकांना घनकचरा व्यवस्थापनांतर्गत ओला कचरा सोसायटीमध्ये जिरवण्याचे प्रकल्प उभारून दिलेले नाहीत. तसेच, आवश्‍यक यंत्र सामुग्री उपलब्ध करून दिलेली नाही, अशा बांधकाम व्यावसायिकांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी सोसायटी फेडरेशनने केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आमदार लांडगे म्हणाले, ""ओला कचरा प्रक्रिया प्रकल्प नसलेल्या गृहप्रकल्पांच्या बांधकाम व्यावसायिकांवर कार्यवाही करावी. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कचरा प्रकल्प नसताना, महाराष्ट प्रदूषण नियंत्रण मंडळाचे "ना हकरत प्रमाणपत्र' नसताना ह्या बांधकाम व्यावसायिकांच्या गृहप्रकल्पास बांधकाम पूर्णत्वाचे दाखले दिलेले आहेत. त्यांची चौकशी करून कारवाई करावी. कचरा प्रक्रिता यंत्र खरेदी करून द्यावेत. प्रकल्प कार्यान्वित होईपर्यंत कचरा उचलावा.'' 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पाच दिवसांत बिल्डरांना नोटीस 
येत्या पाच दिवसांत संबंधित बांधकाम व्यावसायिकांना नोटीसा बजावण्यात येतील. ज्यांनी ग्रहप्रकल्पांमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प करून दिलेली नाहीत. त्यांच्यावर नियमांप्रमाणे कारवाई करण्यात येईल. तसेच, बांधकाम विभागातील ज्या अधिकाऱ्यांनी बिल्डरला पाठीशी घातले. नियमांचे उल्लंघन करून बांधकाम पूर्णत्वाचे दाखले दिलेले आहेत. त्यांची चौकशी केली जाईल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why the wrong punishment of the administration to the society holders ?; MLA Landage's question to Municipal Commissioner