पिंपरी-चिंचवडमधील सराफ दुकानांतून दागिने चोरणारी महिला अखेर जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 November 2020

  • सोने खरेदीच्या बहाण्याने सराफी दुकानात येऊन दागिने चोरणाऱ्या महिलेला सांगवी पोलिसांनी अखेर अटक केली.

पिंपरी : सोने खरेदीच्या बहाण्याने सराफी दुकानात येऊन दागिने चोरणाऱ्या महिलेला सांगवी पोलिसांनी अखेर अटक केली. या महिलेकडून सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

विद्या गंगाधर थोरात (वय 49, रा. निळेमोरेगाव, नालासोपारा, मुंबई पश्‍चिम, मूळ-नगर) असे आरोपी महिलेचे नाव आहे. 31 ऑक्‍टोबरला जुन्या सांगवीतील एका दुकानातून सोने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या आरोपी महिलेने दोन लाख 15 हजारांचे दागिने चोरल्याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. पोलिसांनी घटनास्थळासह परिसरातील गल्ल्यांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. यामध्ये ही महिला मुख्य रस्त्याऐवजी गल्ल्यांमधील रस्त्याचा वापर करत असल्याचे समोर आले. त्यानुसार तपास केला असता, आरोपी ही सफेद रंगाच्या मोटारीतून बसून जात असल्याचे निष्पन्न झाले.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या मोटारीचा शोध घेऊन चालकाला ताब्यात घेत चौकशी केली, ती महिला गाडी भाड्याने घेऊन शहरात तिच्या नातेवाइकांकडे येत असल्याचे समजले. त्यानंतर 6 नोव्हेंबर रोजी ही महिला पिंपळे गुरव येथे तिच्या नातेवाइकाकडे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सृष्टी चौकात सापळा रचण्यात आला. ती महिला रिक्षामधून उतरत असताना तिला ताब्यात घेण्यात आले. सखोल तपास केल्यावर तिने गुन्हे केल्याची कबुली दिली. या महिलेकडून चिंचवड व सांगवी पोलिस ठाण्यातील प्रत्येकी तीन, असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले. आरोपीकडून सहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. 

गर्दीचा फायदा घेत दागिने लंपास 
गर्दी असलेल्या दुकानात शिरल्यानंतर दुकानचालकाची नजर चुकवून ही महिला दागिने लंपास करायची. सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील आठवडाभरात या महिलेने तीन गुन्हे केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman arrested for stealing jewelery from jewelery shops in pimpri chinchwad