वाह! याला म्हणतात माणुसकी; तीन महिन्यांनी 'त्या' महिलेचा शोध घेतला अन्...

संजय बेंडे 
Sunday, 21 June 2020

येथील एका महिलेची सुमारे सत्तर हजार रुपयांचे सव्वा तोळे सोन्याचे गंठण आणि पाच हजार रुपये रोख रक्कम असलेली पर्स पिंपळे गुरवमध्ये प्रवास करताना २१ मार्च रोजी हरविली.

भोसरी : येथील एका महिलेची सुमारे सत्तर हजार रुपयांचे सव्वा तोळे सोन्याचे गंठण आणि पाच हजार रुपये रोख रक्कम असलेली पर्स पिंपळे गुरवमध्ये प्रवास करताना २१ मार्च रोजी हरविली. ती पर्स लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयातील वरिष्ठ लिपीक नासिर खान यांना सापडली. खान यांना पर्समध्ये भोसरीतील समता विकास मंडळाच्या गणेश मंदिराला दिलेल्या देणगीची पावती सापडली. खान यांनी मंदिराच्या पदाधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेटून संपर्क साधला. मंडळाने सूचना फलकावर पर्स मिळाल्याचे लिहून संबंधितांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

मात्र २२ मार्च जनता कर्फ्यू आणि लॅाकडाउनमुळे कोणीही संपर्क साधला नाही. यातच तीन महिन्यांचा काळ उलटून गेला. मात्र, मंडळाने पर्समध्ये सापडलेल्या सोने खरेदीच्या पावतीवरून सोनाराशी संपर्क साधला. सोनाराद्वारे महिलेची माहिती मिळाल्यावर खात्री करून खान आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्या महिलेची पर्स सोने व रोख रकमेसह रविवारी तारिख २१ जून रोजी त्या महिलेला सुपुर्द केली. तीन महिन्यानंतर सोने व पैसे परत मिळाल्याने त्या महिलेच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आनंदाश्रूने महिलेने उपस्थितांचे आभार मानले आणि माणूसकी अजूनही जीवंत असल्याचे निदर्शनास आले. 

२१ मार्च रोजी पिंपळे गुरवमधील मदिना मशिदमधून नमाज करून रात्री साडेआठ वाजता बाहेर आल्यानंतर रस्त्यावरून काही तरी उचलून तीन मुले दुचाकीने घाईगडबडीने जाताना लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयातील वरिष्ठ लिपीक नासीर खान आणि ताहेर शेख यांनी पाहिले. त्यामुळे खान व शेख यांनी त्यांचा पाठलाग केला. सुमारे दीड किलोमीटरच्या पाठलागानंतर त्या मुलांना गाठले. मुलांकडे विचारपूस केल्यावर त्यांनी पर्स सापडल्याचे सांगितले. खान यांनी ती पर्स त्या मुलांकडून ताब्यात घेतली. पर्समध्ये सोन्याचे मंगळसूत्र आणि काही पैसे होते. त्याचबरोबर त्या पाकिटामध्ये भोसरीतील इंद्रायणीनगरातील समता गणेश मंदिराला दिलेल्या पन्नास रुपयांच्या देणगीची पावती होती. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खान यांनी दुसऱ्या दिवशी इंद्रायणीनगरातील समता विकास मंडळाच्या गणेश मंदिराच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन पर्स सापडल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष रामदास जाधव, बाळासाहेब म्हस्के यांना दिली. मात्र, मंडळाकडे त्या महिलेचा पत्ता नव्हता. मंडळाने मंदिराच्या सूचना फलकावर पर्स सापडल्याची आणि ओळख पटवून संबंधितांनी घेऊन जाण्याचे आवाहन केले. मात्र, कोरोना व्हायरसचा प्रसार थोपविण्यासाठी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू आणि त्यांनतंर लॅाकडाऊन सुरू झाल्याने कोणीही मंदिराशी संपर्क साधला नाही. दरम्यान, खान यांनी पाच-सहा वेळा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून संबंधित महिलेविषयी विचारपूस केली. मात्र काहीच प्रगती होऊ शकली नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

मात्र, संचार बंदीमध्ये शिथीलता आल्यावर पुन्हा एकदा संबंधित महिलेची शोध मोहीम सुरू करण्यात आली. पर्सची पाहणी केली असता पर्समध्ये सोने खरेदी केल्याची पावती सापडली. मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधीत सोन्याच्या दुकानाशी संपर्क साधल्यावर त्या महिलेचे नाव  शकुंतला भानवसे असल्याचे त्याचप्रमाणे त्या भोसरीतील शांतिनगर येथे राहत असल्याचे समजले. सोनाराकडून त्या महिलेचा दूरध्वनी क्रमांक मिळवून मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी शुकुंतला यांच्याशी सपर्क साधला. शकुंतला यांना रविवारी (ता. २१) त्यांची सोन्याच्या ऐवजासह रोख रक्कम असलेली पर्स सुपुर्द करण्यात आली. या वेळी  नासीर खान, ताहेर शेख, मंदिराचे अध्यक्ष रामदास जाधव, बाळासाहेब म्हस्के,  कैलास गोरडे, अरुण चव्हाण, शशीकांत गुजर, श्रीपाल ज्वेलर्सचे ओंकार, संपत वाबळे,  अनवर सय्यद, गिरीश वाघमारे, शरद खोपडे आदी उपस्थित होते.

सुवर्ण भिशीतून गंठण खरेदी केले

५३ वर्षीय असलेल्या शकुंतला भानवसे या भोसरीतील शांतिनगरमधील एका संपनीत वाचमनचे काम करतात. पतीपासून विभक्त असलेल्या शकुंतला या कंपनीने दिलेल्या घरातच राहतात. सुवर्ण भिशी लावून त्यांनी थोडे-थोडे पैसे जमा करून सोन्याचे गंठण घेतले होते. हे गंठण त्या सांगवीमध्ये राहणाऱ्या मुलीकडे सुरक्षीत ठेवण्यासाठी २१ मार्च रोजी निघाल्या होत्या. मात्र पर्समध्ये ठेवलेले गंठण पिंपळे गुरवमध्ये पडले. त्यानंतर चार दिवस शकुंतलाबाईने जेवण केले नव्हते. मात्र सोन्याचे गंठण पुन्हा मिळाल्याने शकुंतला बाईच्या चेहऱ्यावरून आनंद स्पष्टपणे दिसत होता.     

महिलेच्या चेहऱ्यावर आनंद

सोन्याचे गंठण सापडल्यावर शकुंतलाबाईने पर्समधील पाच हजार रुपये नासीर खान यांना देऊ केले. मात्र, खान यांनी ते नाकारले. या पैशापेक्षा तुमच्या चेहऱ्यावरील आनंद आमच्यासाठी लाख मोलाचा असल्याचे खान यांनी शकुंतलाबाईंना सांगितले. शकुंतला यांनी मनापासून खान आणि मंदिराच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.   

नासीर शेख 'सकाळ'चे वाचक

लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयातील वरिष्ठ लिपीक नासीर शेख यांनी दैनिक 'सकाळ'चे १९८५ पासून नियमित वाचक असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे 'सकाळ'ने समाजात होत असलेल्या अन्यायावर वेळोवेळी वाचा फोडून न्याय देत असल्याबद्दल कौतुक केले. 'सकाळ'च्या प्रत्येक उपक्रमात नियमित सहभागी होत असल्याचेही अभिमानाने खान यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women lost cash and gold at pimple gurav