फराळातून रोजगाराचे अर्थचक्र होणार गतिमान; महिला व्यावसायिकांना ऑर्डरची प्रतीक्षा

सुवर्णा नवले
Monday, 2 November 2020

 दरवर्षी परदेशात व गावोगावी फराळाचा वाणवळा दिला जायचा. मात्र, यावर्षी तो देखील नाही. दिवाळी बारा दिवसांवर येऊनही बोटावर मोजण्याइतपतच  बुकिंग महिलांकडे झालेले आहे. 

पिंपरी : नामांकित मिठाई ब्रॅंडच्या दुकानातून बरेच खवय्ये दरवर्षी महागड्या रेडिमेड फराळाची खरेदी करतात. घराघरांत फराळाचा स्वाद दरवळत असतो.  बऱ्याच जणांच्या घरी पंधरा दिवस आधीच आवडीचे विविध खमंग पदार्थ बनविण्यास सुरुवात होते. मात्र, लॉकडाउनपासून सर्वच आर्थिक गणिते बदलली  आहेत. हातून काम गेलेल्या ब्युटीपार्लर व्यावसायिक व नोकऱ्या, व्यवसाय गमावून बसलेल्या महिलांही यंदा घरगुती फराळाच्या व्यवसायातून ऑर्डरची आस  लावून बसलेल्या आहेत. त्यामाध्यमातूनच महिलांच्या रोजगाराला चालना मिळून काही अंशी अर्थचक्र गतिमान होण्यास मदत होणार आहे. 

शहरात महिलांनी सिझनेबल व्यवसायाच्या माध्यमातून घरगुती फराळाच्या ऑर्डर बुकींगला सुरुवात केली आहे. निगडी, प्राधिकरण, आकुर्डी, काळेवाडी, चिंचवड,  कासारवाडी या भागात घरगुती फराळाच्या ऑर्डर घेतल्या जात आहेत. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी घरगुती फराळाच्या मागणीतही चाळीस टक्के घट झाली  आहे. दरवर्षी परदेशात व गावोगावी फराळाचा वाणवळा दिला जायचा. मात्र, यावर्षी तो देखील नाही. दिवाळी बारा दिवसांवर येऊनही बोटावर मोजण्याइतपतच  बुकिंग महिलांकडे झालेले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महिला व्यावसायिकांनी घरगुती फराळासाठी ना-ना प्रकारच्या शक्कल लढविल्या आहेत. यामध्ये कोम्बो व जम्बो ऑफर ठेवल्या आहेत. फराळाचेही पॅकेजेस  करण्यात आलेले आहेत. स्पेशल भाजणी चकली, चिवडा, शंकरपाळी, बेसन लाडू, रवा लाडू हे प्रत्येकी 200 ग्रॅम 499 रुपये, यासह मका चिवडा, लसूण शेव,  शंकरपाळी नमकिन हे 999 रुपये, तसेच बुंदी लाडू, करंजीसह 1499 रुपयाचे हॅम्पर पॅकेट बनविले आहेत. हे सर्व पॅकेट पाच किलोपासून आहेत. तेल, डाळी व  शेंगदाणा, खोबऱ्यासह सर्वच वस्तू महागल्याने ऑर्डर मात्र दहा दिवस आधी बुक करायची आहे. दिवाळी फराळ घरपोच दिला जात आहे. आकर्षक पार्सल व  पॅकिंग सेवाही महिला देत आहेत. 

फराळ दरात 10 ते 15 टक्‍क्‍यांनी वाढ 
शेंगदाणा, तेल, खोबरे, डाळी महागल्याने रेडिमेड दिवाळी फराळाच्या दरातही वाढ झाली आहे. 

"माझ्याकडे सध्या सात ते आठ महिला ग्रुपने मिळून काम करीत आहेत. कोणी लाडू, शेव, बुंदी, चिवडा, शंकरपाळ्या, अनारसे अशा विविध पाककलेत पारंगत  आहे. तळणी, भाजणी यासाठीही कौशल्य लागते. बऱ्याच जणींना लॉकडाउनपासून काम नाही. सध्या दिवसाला चारशे रुपये त्यांना मिळत आहेत.'' 
- अंकिता राऊत, निगडी, प्राधिकरण 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"विमाननगरला हॉटेल होते. सध्या व्हेज व नॉनव्हेजच्या घरगुती ऑर्डर घेत आहे. आई, आजी आणि मी मिळून फराळ व्यवसाय करीत आहे. वीस टक्के  किराणा दर वाढलेले आहेत. सोशल मीडियावरून मार्केटिंग करत आहे. रावेत ते आंबेगाव व हिंजवडीपासून मंचरपर्यंत ऑर्डर घेतो. दरवर्षी दसऱ्यापूर्वीच ऑर्डर  बुकिंग होत असत. यंदा कमी प्रमाणात प्रतिसाद आहे. दिल्ली व जर्मनीतूनही माझ्या स्वादिष्ट फराळाच्या ऑर्डर जात आहेत.'' 
- मनीषा कडदेकर, कासारवाडी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women professionals awaiting for Diwali sweet orders