esakal | Video : 'या' कारणामुळे भक्ती-शक्ती चौकातील पुलाचं काम रखडलंय...
sakal

बोलून बातमी शोधा

Video : 'या' कारणामुळे भक्ती-शक्ती चौकातील पुलाचं काम रखडलंय...

लॉकडाउनच्या कालावधीत भक्‍ती-शक्‍ती चौकामध्ये उभारण्यात येणाऱ्या पूल उभारणीच्या कामावर असणारे परराज्यातील कामगार गावाला निघून गेल्यामुळे या भागातील काम अडकून पडल्याचे समोर आले आहे.

Video : 'या' कारणामुळे भक्ती-शक्ती चौकातील पुलाचं काम रखडलंय...

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पिंपरी : लॉकडाउनच्या कालावधीत भक्‍ती-शक्‍ती चौकामध्ये उभारण्यात येणाऱ्या पूल उभारणीच्या कामावर असणारे परराज्यातील कामगार गावाला निघून गेल्यामुळे या भागातील काम अडकून पडल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत या पूलाचे 20 टक्‍के काम बाकी असून, ते कधी पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागणार असा प्रश्‍न त्यामुळे निर्माण झाला आहे. 

सद्य:स्थिती काय ? 

लॉकडाउन जाहीर होण्याअगोदर याठिकाणी 300 कर्मचारी काम करत होते. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर यापैकी अनेक जणांनी आपल्या गावी जाण्यास सुरुवात केली. केंद्र सरकारने श्रमिक रेल्वे सुरु केल्यानंतर इथले अनेक कर्मचारी गावी रवाना झाले. याठिकाणी काम करणारे बहुतेक कर्मचारी हे उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड या भागातील आहेत. सध्या याठिकाणी अवघे 40 कामगार काम करत आहेत. त्यामुळे पुलाचे राहिलेले काम त्यांच्याकडून पूर्ण होणे अशक्‍य आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, आता परराज्यातील कर्मचारी हळूहळू परतू लागले आहेत. त्यामुळे पुलाचे काम करणाऱ्या संबधित कंत्राटदाराने त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे. मात्र, तसे होताना दिसत नसल्यामुळे या पुलाचे काम पूर्ण होण्यास विलंब लागण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत महापौरांनी चार फेब्रुवारी आणि 23 मे असे दोन वेळा या पुलाला भेट दिली होती. त्यावेळेस 12 जूनपर्यंत पुलाचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, लॉकडाउन आणि कामगारांची कमतरता या दोन कारणांमुळे हे काम अद्यापपर्यंत पूर्ण होऊ शकलेले नाही. 

काम पूर्ण करण्याची मुदत ऑगस्ट अखेरपर्यंत 

या पुलाचे काम करण्यासाठी ऑगस्ट अखेरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. जुलै 2017 मध्ये सुरु झालेले हे काम डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, या भागातील वाहतूक वळवण्यासाठी संरक्षण विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्या जागेतून वळवण्यात आली आहे. त्याची परवानगी मिळवण्यात वेळ गेल्यामुळे या कामाला मुदतवाढ देण्यात आली होती. आता या पुलाचे काम ऑगस्ट अखेरपर्यंत पूर्ण करण्याची मुदत कंत्राटदाराला देण्यात आली आहे. लॉकडाउन शिथिल होऊ लागला असून, आतापर्यंत ठप्प झालेल्या कामांना पुन्हा सुरुवात झाली आहे. तरी या पुलाच्या कामाने मात्र, अद्याप वेग पकडलेला नाही. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी कधी खुला होणार, असा सवाल उपस्थित झाला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


भक्‍ती शक्‍ती चौकामध्ये सुरु असणाऱ्या पुलाच्या कामाच्या ठिकाणी कामगार नसल्यामुळे काम अडकून पडले आहे. संबधित कंत्राटदारांनी पुलाच्या कामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या परराज्यातील कर्मचाऱ्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे. त्यामुळे पुलाचे राहिलेले काम लवकर पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला करता येणे शक्‍य होणार आहे. 

- विजय भोजने, प्रवक्‍ता, बीआरटी, पिंपरी-चिंचवड महापालिका
 

loading image