आयटीयन्सना आधीच जॉबची भीती, त्यात आता आरोग्याच्या 'या' तक्रारी!

सुधीर साबळे
Tuesday, 9 June 2020

वर्क फ्रॉम होममुळे आयटीयन्सना घरातून काम करण्याची सुविधा मिळतेय. त्यामुळे त्यांच्या नेहमीच्या वेळापत्रकामध्ये बदल झाला आहे. काम करत असताना अनेकदा वेळेचं बंधन नसते.

पिंपरी : आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या अमितचं लॉकडाउनच्या काळात घरातून काम सुरू होतं. आपण तंदुरुस्त आहोत का, हे जाणून घेण्यासाठी त्यानं लॉकडाउन शिथिल होऊ लागल्यानंतर आरोग्य तपासणी केली. त्यामध्ये त्याला रक्‍तातील साखर वाढल्याचं आढळून आलं. दोन महिन्यांच्या कालावधीच, हे कसं झालं याचा शोध त्याने घेतला असता वर्क फ्रॉम होममुळे बदलेलं कामाचं वेळापत्रक, कामामुळे आलेला ताण आणि अनेक दिवसांपासून बंद असणारा व्यायाम यामुळं ही समस्या ओढावल्याचं त्याच्या निदर्शनास आलं. आयटीयन्सना वर्क फ्रॉम होमने काम करण्याच्या नव्या पद्धतीचा अवलंब करावा लागतोय. मात्र, त्यामुळं मधुमेह, रक्‍तदाब या आरोग्य समस्यांना निमंत्रण मिळू लागलंय. लॉकडाउनच्या काळातील दोन महिन्यांमध्ये हे प्रमाण सुमारे दहा टक्‍यांपर्यंत गेल्याची शक्‍यता वर्तविण्यात आलीय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप     

या आहेत समस्या 

वर्क फ्रॉम होममुळे आयटीयन्सना घरातून काम करण्याची सुविधा मिळतेय. त्यामुळे त्यांच्या नेहमीच्या वेळापत्रकामध्ये बदल झाला आहे. काम करत असताना अनेकदा वेळेचं बंधन नसते. त्यातून येणारा कामाचा ताण, बऱ्याचदा प्रोजेक्‍ट नसल्यामुळे नोकरीवर असणारी टांगती तलवार, अचानकपणे होणारी पगार कपात, अशा अनेक कारणांमुळे ब्लॅडप्रेशरमध्ये वाढ होणं, रक्‍तातील साखर वाढणं, असे प्रकार वाढीस लागत आहेत. या समस्येतून मानसिक ताण वाढतोय आणि मेंदूमधून रक्‍तामध्ये येणाऱ्या रसायनांचा हृदय आणि रक्‍तवाहिन्यांवर परिणाम होतो. त्यातून रक्‍तामधील साखरेचं प्रमाण वाढणं, हृदयाची धडधड वाढणं, घाम येणं असे प्रकार होतात. बऱ्याचदा मानसिक आजारांमुळे हृद्यरोगांना आमंत्रण मिळतं. त्यामुळे काम करताना प्रत्येकाने योग्य ती काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काम करताना ही काळजी घ्या... 

  • हृदयरोगापासून दूर राहाण्यासाठी सर्वात प्रथम आपले मानसिक आरोग्य ठिक ठेवा. 
  • कोणतेही काम करताना त्याचा ताण घेऊ नका. 
  • दिवसभराची दिनचर्या सुरू करण्याआधी एक तासभराचा वेळ व्यायामासाठी द्या. 
  • नकारात्मक विचार मनात आणू नका. 
  • मन:शांतिसाठी ध्यानधारणा आणि योगसाधनेसाठी वेळ द्या. 
  • आरोग्याची समस्या जाणवत असल्यास उशीर न करता तत्काळ डॉक्‍टरांचा सल्ला घ्या. 

आयटीयन्ससाठी फिटनेस चॅलेंजचा फंडा... 

वर्क फ्रॉम होममुळे आयटीयन्सच्या कामाच्या शैलीत झालेल्या बदलामुळे त्यांना रक्‍तदाब वाढणं, मधुमेह अशा आरोग्य समस्या भेडसावू लागल्या आहेत. प्रामुख्यानं मानसिक ताणतणावातून या गोष्टी उद्भवत आहेत. त्यावर मार्ग काढण्यासाठी आयटी कर्मचाऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी या कर्मचाऱ्यांसाठी फिटनेस चॅलेंजचा फंडा राबवण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामध्ये डॉक्‍टरांच्या व्हिडिओच्या माध्यमातून शरीर फिट ठेवण्याच्या टिप्स देणे, अशा प्रकारची माहिती त्यांना पोहोचवण्यात येत असल्याचं राज्य सरकारच्या आयटी समितीचे सदस्य पवनजित माने यांनी सांगितले.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आयटीयन्समध्ये रक्‍तदाब वाढणं, मधुमेह अशा समस्या आढळण्याचं प्रमाण सुमारे 25 टक्‍क्‍यांपर्यंत आहे. लॉकडाउनच्या काळात त्यांच्या नेहमीच्या वेळापत्रकामध्ये बदल झालाय. त्यामुळे आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार संकटात आले आहेत. त्यामुळेही मानसिक ताणतणावात वाढताना दिसत आहेत. काम करताना प्रत्येकानं आरोग्याकडे सर्वाधिक लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. 
- डॉ. अभिजित वैद्य, हृदयरोगतज्ञ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: work from home increased blood pressure and diabetes in it employees pune pimpri chinchwad city