गावजत्रेतील आखाडे बंद राहिल्याने खुराकाची कमाई बुडली, पैलवानांची व्यथा

Wrestling
Wrestling

पिंपरी - शहर परिसरातील दरवर्षी, उन्हाळ्याच्या दिवसांत होणाऱ्या गावजत्रा आणि त्यामधील कुस्त्यांचे फड यंदा रद्द झाल्याने लहान-मोठ्या पैलवानांचा वर्षभराच्या खुराकाची कमाई बुडाली आहे. काही पैलवानांना खुराकासाठी पैशांची चणचण भासू लागली आहे. 

पिंपरी चिंचवड शहर परिसरात दरवर्षी, निरनिराळ्या गावे आणि वाड्या-वस्त्यांवर त्या त्या ग्रामदैवतांच्या नावाने गावजत्रा भरत असतात. त्यानिमित्त, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. तसेच या बरोबरीने कुस्त्यांचे फडही रंगत असतात. 

दरवर्षी साधारणतः डिसेंबर-जानेवारी महिन्यात आकुर्डी येथील गावजत्रेने हंगामाला सुरूवात होते. त्यानंतर, रहाटणी, काळेवाडी, दापोडी, पिंपळे गुरव, वाकड, चिखली, मोशी, चऱ्होली, दिघी, खराळवाडी, कासारवाडी, पिंपळे सौदागर, किवळे, पुनावळे, ताथवडे, थेरगाव, पिंपरी गाव आदी भागांत गावजत्रा होतात. यानिमित्ताने, कुस्त्यांची मैदाने भरतात. त्यामध्ये, स्थानिक आणि बाहेर गावचे अनेक लहान-मोठे पैलवान उतरून कुस्ती प्रेमींची मने जिंकत असतात. त्यामधून, पैलवानांच्या वर्षभराच्या खुराकाची देखील सोय होत असते. त्यासाठी १२ ते १३ मीटरचा खास मातीचा आखाडा तयार केला जात असतो. त्यावर, लहान-मध्यम वजनाच्या २ ते ३ कुस्त्या एकाच वेळी चालू असतात. मोठ्या पैलवानांचे जोड लावून त्यांच्या कुस्त्या होतात. काही वेळेस मोठ्या कुस्त्या अर्धा-पाऊण तासांपर्यंत देखील रंगत असतात. त्यामधून, पैलवानांना इनामाची रक्कम मिळते. या शिवाय, कुस्त्या पहायला आलेले गावोगावचे कुस्ती शौकिन देखील आपापल्या परीने चांगली कुस्ती करणाऱ्या पैलवानांना रोख रक्कमेच्या स्वरूपात बक्षिसांचा वर्षाव करत असतात. अनेक कुस्ती शौकिन वाड-वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ पैलवानांना बक्षिसे आणि चांदीची गदा इनाम म्हणून ठेवत असतात. मात्र, यंदा त्यावर पूर्ण पणे पाणी फिरले आहे. 

नामवंत पै.विष्णू खोसे म्हणाला, "अनेक पैलवानांच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. बहुतेक पैलवान गरीब घरामधूनच पुढे येतात. जत्रा-आखाड्यांच्या बक्षीसांमधून पैलवान वर्षभराच्या खुराकासाठी कमाई देखील करत असतो. मात्र, आता अनेक पैलवानांना खुराकासाठी चिंता सतावत आहे. नवोदित पैलवानांना याचा मोठा फटका बसला आहे. सराव ही नीट होत नाही. आम्ही वर्षभर तालमीत असतो. गावजत्रेनिमित्त आमचे फिरणे होत असते. पिंपरी चिंचवड ला अनेकदा गावजत्रांच्या आखाड्यात कुस्त्या करत असतो."

कोण-कोण खेळले जत्रेतील कुस्त्या
महाराष्ट्र केसरी विकी बनकर, विजय चौधरी, अभिजीत कटके, बाळा रफीक शेख, विष्णू खोसे , सचिन येलभर, आदी दिग्गज पैलवानांनी देखील ठिकठिकाणच्या जत्रेच्या कुस्त्या गाजविल्या आहेत. शहरातील जत्रेतील कुस्त्यांमधून ५० ते ६५ किलो वजन गटापर्यंतचे पैलवान लाख-सव्वा लाखांची कमाई करत असतात. तर, मोठे पैलवान १० लाख रूपयांपर्यंत इनाम जिंकत असतात. कुस्त्यांच्या फडावर नामांकित पैलवानांना बोलावून त्यांचा यथोचित मान-सन्मान देखील केला जात असतो. 

यंदाच्या वर्षी वर्गणीच मागितली नाही
"गेल्या वर्षी आमच्या जत्रेत १०२ कुस्त्या झाल्या. त्यासाठी एकूण २ लाख ८३ हजार रुपयांचे इनाम गावकऱ्यांनी ठेवले होते. यंदा वर्गणीच मागितली नाही." - रतन लांडगे, माजी खजिनदार, श्री भैरवनाथ उत्सव समिती, कासारवाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com