esakal | कुत्र्याने केला घात, दुचाकीस्वार तरुणाचा गेला नाहक बळी
sakal

बोलून बातमी शोधा

कुत्र्याने केला घात, दुचाकीस्वार तरुणाचा गेला नाहक बळी

कासारवाडीतील घटना; कुटुबांचा 'आनंद'च हिरावला 

कुत्र्याने केला घात, दुचाकीस्वार तरुणाचा गेला नाहक बळी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्याने शिक्षण घेतले. लष्कराच्या प्रशासन विभागात नोकरी मिळाली. उच्चशिक्षित मुलीशी विवाह झाला. संसारवेलीवर मुलाच्या रुपाने फूल उमलले. घरभाडे व घरखर्च भागवून बचत केली. त्यातून आळंदीसारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दोन वर्षांपूर्वी घर घेतले. पत्नी व मुलासह आनंदात दिवस जात होते. पण, रविवारी (ता. 27) रात्री अकराच्या सुमारास कासारवाडीजवळ भटक्‍या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात दुचाकी घसरली आणि डोक्‍याला मार लागून त्याचा मृत्यू झाला. आनंद सोमन्ना पुजारी (वय 32, रा. काळे कॉलनी, आळंदी) या तरुणाची ही शोकांतिका. एका भटक्‍या कुत्र्यामुळे कुटुंबाचा आनंदच हिरावला गेला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दुचाकी असो की चारचाकी मोटार. भटकी कुत्री अंगावर धावून आल्याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. काहींनी वाहनाचा वेग कमी केला असेल किंवा थांबले असतील. काहींनी घाबरून अधिक वेगाने वाहन दामटले असेल आणि तितक्‍याच वेगाने कुत्र्यांनी तुमचा पाठलाग केला असेल. कुत्रे मागे पडल्यानंतर "सुटलो बुआ एकदाचे' म्हणत सुस्काराही सोडला असेल. पण, अशाच एका भटक्‍या कुत्र्यामुळे दुचाकीस्वार तरुण आनंद पुजारी यांना प्राण गमवावा लागला. पत्नी जया व मुलगा श्रीपाद यांच्यासह दोन वर्षांपासून ते आळंदीत राहात होते. त्यापूर्वी कासारवाडीत भाडेतत्त्वावर राहात होते. त्यांचे आई-वडिलही कासारवाडीतच राहात. दोन वर्षांपूर्वी ते चिखली घरकूलमध्ये सदनिका मिळाल्याने राहायला गेले. पण, कासारवाडीत बालपण गेल्याने मित्र परिवाराला भेटायला आनंद नेहमी कासारवाडीला यायचे. शिवाय, सीएमईत ड्युटी असल्याने कासारवाडीतच फ्लॅट घेण्याचा त्यांचा मनोदय होता. त्यासाठी पंधरा दिवसांपूर्वीच त्यांनी कासारवाडीतील एक फ्लॅट बघितला होता, असे त्यांच्या मित्रांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डोक्‍याला मार लागल्याने मृत्यू 

आनंद पुजारी यांच्या घरातील वातावरण धार्मिक होते. धार्मिक ग्रंथ वाचनाची आवडही त्यांना होती. रविवारी ते ग्रंथ घेण्यासाठीच कासारवाडीला गेले होते. त्याच वेळी त्यांच्यावर कुत्र्याने हल्ला केला. दुचाकी पडल्याने त्यांचे हेल्मेट तुटून पडले होते, असे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. अपघाताबाबत कळताच त्यांच्या मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली व रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. "गाडी घसरून पडल्याने डोक्‍याला मार लागला व त्यात आनंद यांचा मृत्यू झाला,' असे पोलिसांनी सांगितले. त्यांच्यावर मूळगाव विजापूर (कर्नाटक) येथे अंत्यविधी केल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. 
 

loading image