Interview : "सिनेमाच्या यशापयशाचा माझ्यावर परिणाम होत नाही" ; कासरा सिनेमातील जबरदस्त भूमिका आणि जोरम सिनेमावर स्मिताचं मत

Actress Smita Tambe interview on her upcoming movie : अभिनेत्री स्मिता तांबेचा लवकरच कासरा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या निमित्ताने वाचा तिची दिलखुलास मुलाखत.
Interview : "सिनेमाच्या यशापयशाचा माझ्यावर परिणाम होत नाही" ; कासरा सिनेमातील जबरदस्त भूमिका आणि जोरम सिनेमावर स्मिताचं मत

रवी नागपूरे यांच्या साई उत्सव फिल्म्स या निर्मिती संस्थेने कासरा या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. विकास विलास मिसाळ हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. पारंपरिक शेती ते आधुनिक शेती या अनुषंगाने शेतकऱ्यांचं जगणं तसेच त्यांच्या संघर्षाची कथा या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. अभिनेत्री स्मिता तांबे या चित्रपटात मुख्य भूमिका साकारीत आहे. त्यानिमित्त तिच्याशी केलेली बातचीत...

प्र: तू एक दशकाहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेस. आतापर्यंत विविध भूमिका तू साकारल्या आहेस.तुला स्टारडम प्राप्त झाले आहे. याकडे तू कोणत्या दृष्टिकोनातून पाहतेस...?

- मी ज्या प्रकारे मन लावून आणि प्रामाणिकपणे माझ काम करत आहे त्यावेळी मला माहिती होतं की मी काही तरी नक्कीच मिळवेन. त्यामुळे मला मिळालेल्या माझ्या चाहत्यांच्या प्रेमाकडे मी अजिबातच आश्चर्यचकित होऊन बघत नाही. पण एक गोष्ट निश्चित की लोक मला पठडी बाहेरच्या असणाऱ्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पसंत करीत आहेत. माझ्या अशा भूमिकांना त्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. मी कोणत्याही भाषेतील चित्रपटामध्ये काम करू शकते आणि मी कोणताही भाषा आत्मसात करू शकते. माझे काम हा माझा आत्मा आहे आणि त्याकडे मी अधिक लक्ष देते. पुरस्कार आणि् प्रसिद्धी या बाबी नंतरच्या आहेत. पहिले माझे काम आणि अन्य बाबी नंतर. काम हा माझा श्वास आणि ध्यास आहे.

प्र: तू एक उत्तम अभिनेत्री आहेस. तरीही आम्हाला असे वाटते की तुझ्यातील अभिनयकौशल्य अजूनही काही दिग्दर्शकांना दिसले नाही आहे?

- हो नक्कीच. मला बऱ्याच वेळा असं वाटत की अमुक रोलसाठी का माझा विचार केला नाही? असं काय होत या रोलमध्ये की मी तो करू शकत नाही?. तर याबाबतीत मला असं वाटत की अशा रीतीने त्यांच्यावर आरोप करत विचार करण्यापेक्षा मी असा विचार करीन की, माझ्याकडे आता काय काय काम आहे? आणि मी ते कशा प्रकारे वेगळं करू शकते. एकूणच सांगायचं तर कोण माझ्याकडे येत नाहीत यापेक्षा कोण माझ्याकडे आहेत याचा विचार मी पहिला करते. आतापर्यंत मला खूप चांगले दिग्दर्शक मिळाले आहेत आणि एक कलाकार म्हणून त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. या गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत.

प्र: प्रत्येक दिग्दर्शकाची स्टाईल निराळी असते. त्यामुळे तू चित्रपट निवडताना संबंधित दिग्दर्शकांच्या शैलीचा अभ्यास करतेस का?

- मी बऱ्याच वेळा नवोदित दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. कारण मुळात मला माझ्या कामात नवीन नवीन प्रयोग करायला आवडतात आणि जे मी नवोदित दिग्दर्शकांसोबत करू शकते. नेहमी नवीन प्रोजेक्ट घेण्यामागचे निकष हे वेगवेगळे असतात. कधी कधी स्कीप्ट काय आहे हे यासाठी मॅटर करत तर कधी कधी पात्र काय आहे या गोष्टी महत्त्वाच्या असतात. दिग्दर्शक त्या कथेला कशी ट्रीटमेंट देतात या गोष्टी नंतर येतात. माझ्या अशा बऱ्याच फिल्म्स आहेत ज्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आल्या नाहीत किंवा त्यांना फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. पण त्यातील माझं काम जेव्हा लोक पाहतात आणि ते ज्या भावनेने मला कॉल करून माझं अभिनंदन करतात, ही माझ्या कामाची खरी पोचपावती असते. मला असं सतत वाटत की कोणती तरी स्क्रिप्ट वा कोणते तरी पात्र मला क्लिक झाले पाहिजे आणि मी नेहमीच वेगवेगळ्या प्रयोगांसाठी तयार असते. मला अजून असं पण वाटत की आपण सतत नवीन नवीन लोकांसोबत तसेच नवीन टीम सोबत काम केलं पाहिजे. यामुळे एक अभिनेत्री म्हणून आपला विकास होईल. कारण काय होतं,की जेव्हा आपण एकाच ग्रुप मध्ये काम करतो तेव्हा आपल्याला माहिती असतं की काय केल्याने काय होईल. ज्यामुळे निर्मिती कौशल्याची वाढ खुंटते. त्यामुळे आपण सतत नवीन टीम सोबत काम केले पाहिजे जेणेकरून आपल्या कामात सर्जनशीलता येते.

प्र: कधी कधी आपल्याला अपयश येते त्यावेळी एक कलाकार म्हणून तुझ्या काय भावना असतात?

- खरं सांगायचं तर यश- अपयशाच्या संकल्पना मला काही समजत नाहीत. त्यामुळे माझं कोणतं काम यशस्वी आहे आणि कोणतं काम अयशस्वी आहे, असा माझा मेंदू विचारच नाही करत. जेव्हा माझं अभिनेत्री म्हणून त्या प्रोजेक्टसंबंधीचं काम संपलेलं असतं त्यावेळी माझ्यासाठी तो प्रोजेक्ट खऱ्या अर्थाने संपलेला असतो. मुळात मी ज्या मीडियामध्ये काम करते ते फिल्म मीडिया खूप मोठा आहे. कमर्शियली सक्सेसफुल असणारी फिल्म ही खरंच सक्सेसफुल आहे का? हे विचार करण्यासारखं आहे. म्हणजे एखाद्या चित्रपटाचं यश आणि अपयश याच्या संकल्पना काय असतील ह्या आपण नाही ठरवू शकत. त्यामुळे एक कलाकार म्हणून माझ्यासाठी महत्वाची असणारी गोष्ट तो प्रोजेक्ट आणि त्याची संपूर्ण प्रक्रिया आहे.

प्र: जोरम चित्रपटातील तुझी भूमिका प्रचंड गाजली. काही पुरस्कारही तुला मिळाले. त्या विषयी काय सांगशील?

- मला सतत असं वाटत की पात्र जे बोलत असते तो एक स्क्रीन प्लेचा भाग आहे. पण ते पात्र फक्त तेवढंच मर्यादित नसतं तर ते जगत असतं. ते पात्र श्वास घेत असतं, त्या पात्राचा एक इतिहास असतो आणि मी माझ्या प्रत्येक फिल्ममध्ये ते पात्र जगले आहे. आता गणवेश या माझ्या चित्रपटाला मला नॉमिनेशन होतं. त्यामध्ये माझे मोजून अकरा डायलॉग होते. मुद्दा असा आहे की, पात्राचे डायलॉग म्हणजे पात्राचं अस्तित्व नाही, तर त्या पात्राचं जगण हे त्या पात्रचं अस्तित्व आहे. आता जोरम चित्रपटात असलेलं फुलो कर्मा हे पात्र काय बोललं आहे ह्यापेक्षा ते कसं मी जगवलं आहे वा साकारलं आहे याचं कौतुक करण्यात आलं. त्यासाठी करण्यात आलेली अॅक्टिंग महत्वाची आहे. या चित्रपटात मला खूप कमी आणि छोटे छोटे डायलॉग होते. त्यामुळे मी फक्त एक नजरेत ते वाचले असतील. पण माझा अधिक फोकस हा त्या व्यक्तिरेखेवर होता. ती वयाच्या प्रत्येक टप्प्यावर कशी होती याकडे मी लक्ष दिले. अगदी बारीक बारीक गोष्टींचा मी अभ्यास केला. त्या गोष्टी चित्रपटात नव्हत्या. पण त्या माझ्या डोक्यात पूर्णपणे तयार होत्या आणि यालाच डिटेलिंग वर्क म्हणतात. माझ्याकडे जेव्हा एखाद्या चित्रपटाची स्क्रीप्ट येते तेव्हा मी त्यात माझ्या पात्राला किती डायलॉग दिले आहेत हे नाही बघत तर त्यामध्ये माझ्या पात्राचं जगणं किती आहे, ते बघते.

प्र: कासरा या आगामी चित्रपटातील तुमच्या पात्राबद्दल काय सांगशील?

- या चिटपटाचा विषय मुळात शेती हा आहे आणि शेती हा माझ्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण मी स्वतः शेतकरी कुटुंबातील आहे. आयुष्यात काम करत असताना आपल्याला सामाजिक भान असणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे मी जेव्हा काम करायला आले आणि मी पहिला पांगिरा चित्रपटाचं शूटिंग केलं तेव्हा तो देखील शेतीवरच आधारित चित्रपट होता. तेव्हा मी ठरवलं की वर्षातून एक तरी फिल्म अशी करेन जी समाजहिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असेल. कारण चित्रपट हे एक सामाजिक माध्यम देखील आहे. त्यामुळे सामाजिक भान आपण ठेवले पाहिजे. मी सामाजिक हिताच्या बाबतीत खूप जास्त गंभीर आहे. माझ्याकडे जर कोणी आपले प्रॉब्लेम घेऊन आले तर मी नेहमी ते कसे सोडवता येतील यासाठी प्रयत्नशील असते. त्याच संबंधित हा चित्रपट आहे. कासरा हा चित्रपट आधुनिक शेतीवर भाष्य करणारा आहे. यामध्ये अनेक सामाजिक समस्या आणि त्यावरचे उपाय सांगितले आहेत. या चित्रपटात मी शेतकरी कुटुंबातील मोठी सून आहे. जी कधीच हरत नाही. समस्या आहेत तर त्याचे निराकरण देखील होईलच अशी सकारात्मक विचार तिच्यात आहे.

आपण बऱ्याच वेळा शेतकऱ्यांबद्दल बोलतो. पण शेतकऱ्यांच्या पत्नीविषयी नाही बोलत. पण खरं तर त्यांच्यापेक्षा जास्त मेहनत ह्या शेतकऱ्यांच्या बायका करत असतात. त्या घरपण सांभाळत असतात. आणि शेतातदेखील काम करत असतात. त्यांचे कष्ट देखील खूप महत्वाचे असतात तर अशाच ताई- वहिनींना या चित्रपटातील माझे पात्र रिप्रेझेंट करते.

Interview : "सिनेमाच्या यशापयशाचा माझ्यावर परिणाम होत नाही" ; कासरा सिनेमातील जबरदस्त भूमिका आणि जोरम सिनेमावर स्मिताचं मत
Jawan Movie Review : 'सरकार निवडून देताना हजार वेळा विचार करा!' 'जवान'मध्ये शाहरुखनं केली 'उंगली'

प्र: या पात्रासाठी तुला काय विशेष तयारी करावी लागली?

- मी स्वतःच शेतकऱ्याची मुलगी असल्याने तशी वेगळी काही तयारी करावी लागली नाही. पण तिच्या आतमध्ये ही सकारात्मकता कशी आली आणि त्यामागे तिची विचार प्रक्रिया काय असेल ह्या सगळ्या गोष्टी पडद्यावर मी कशा प्रकारे साकरू शकेन यासाठीची मेहनत मी केली. ते तुम्हाला हा चित्रपट पाहून नक्कीच लक्षात येईल.

प्र: चित्रपटाच्या दिग्दर्शकांबद्दल तुझे मत काय...

- या चित्रपटाचा दिग्दर्शक विकास मिसाळ आहे आणि तो अत्यंत इनोसंट दिग्दर्शक आहे. त्याच्यातील ही निरागसता त्याच्या चित्रपटातही दिसून येते. तसंच ह्या चित्रपटामध्ये तुम्हाला काहीही स्टायलाईज आणि अधिक ताम जाम असं काहीच दिसणार नाही. ही अत्यंत साधी व सरळ फिल्म आहे.

Interview : "सिनेमाच्या यशापयशाचा माझ्यावर परिणाम होत नाही" ; कासरा सिनेमातील जबरदस्त भूमिका आणि जोरम सिनेमावर स्मिताचं मत
Smita Tambe: मन धागा धागा जोडते नवा मालिकेत अभिनेत्री स्मिता तांबेची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com