नव्या इनिंगसाठी सज्ज झाली ध्वनी भानुशाली; पहिल्याच चित्रपटाचा अनुभव सांगत म्हणाली, 'सेटवर माकडं...'

Dhvani Bhanushali: गायिका ध्वनी भानुशाली बॉलीवूड डेब्यूसाठी सज्ज झाली आहे. ‘कहां शुरू कहां खतम’ या चित्रपटातून ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
Dhvani bhanushali
Dhvani bhanushaliesakal
Updated on

गायिका ध्वनी भानुशालीने गायन क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. आपल्या गोड गळ्याने रसिकांना मंत्रमुग्ध केल्यानंतर आता ती बॉलीवूड डेब्यूसाठी सज्ज झाली आहे. ‘कहां शुरू कहां खतम’ या चित्रपटातून ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यानिमित्ताने ती म्हणते, माझ्या गाण्यावर रसिकांनी भरभरून प्रेम केले आहे आणि आता त्यांच्याच बळावर मी माझ्या नव्या इनिंगला सुरुवात करत आहे. ‘कहां शुरू कहां खतम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सौरभ दासगुप्ता यांनी केले असून, या चित्रपटात कॉमेडी-ड्रामा आणि थ्रिलचा जबरदस्त डोस आपल्याला मिळणार आहे. त्या निमित्त ध्वनीशी केलेली खास बातचीत...

तुझा पहिलाच चित्रपट ‘कहां शुरू कहां खतम’ आता प्रदर्शित होत आहे. तुझ्या मनात किती टेन्शन आणि उत्सुकता आहे?

आपले स्वप्न पूर्ण होत आहे याचा आनंद एकीकडे आहे आणि दुसरीकडे काहीसे मनामध्ये टेन्शन आहे. टेन्शन अशासाठी की, आपण कसे काम केले आहे. आपण कशा प्रकारे संवाद म्हटलेले आहेत वगैरे गोष्टी प्रेक्षकांना आवडतील की नाही, याची चिंता खूप आहे; परंतु मी हे सगळे माझ्या नशिबावर सोडून दिले आहे. कारण मी आतापर्यंत अनेक गाणी गायली आहेत आणि पहिल्यांदाच चित्रपटामध्ये काम करीत आहे. त्यामुळे मोठ्या पडद्यावर स्वतःला पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. आमच्या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली आहे. आम्ही चित्रपटाचे प्रमोशन्स जोरदार करीत आहोत. आम्हाला प्रमोशनदरम्यान चांगला पाठिंबा मिळत आहे आणि असाच प्रतिसाद चित्रपटाला मिळावा, अशी अपेक्षा आहे.

या चित्रपटामध्ये तुझी नेमकी भूमिका कशा प्रकारची आहे?

मीरा नावाची भूमिका मी या चित्रपटात साकारीत आहे. ही मजेशीर अशी भूमिका आहे. ती स्वतंत्र विचाराची मुलगी आहे. तिला तिचे जीवन जगायचे असते. त्यामुळे ती तीन दिवसांसाठी घरातून पळून जाते. त्यानंतर तिला पकडून आणली जाते. ही एक धमाल विनोदी फिल्म आहे आणि या चित्रपटातील माझी भूमिका छान आहे.

या चित्रपटाचा जाॅनर रोमँटिक काॅमेडी आहे आणि या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये धमाल-मस्ती दिसत आहे. तू अधिक काय सांगशील..

या चित्रपटाची कथा एका छोट्याशा शहरात घडणारी आहे आणि ती अत्यंत मनोरंजक पद्धतीने मांडण्यात आली आहे. रोमांचक असा हा चित्रपट आहे. सुप्रिया पिळगावकर, राकेश बेदी, राजेश शर्मा, अखिलेश मिश्रा अशी कलाकारांची भक्कम टीम आहे. माझा सहकलाकार अशिम गुलाटी आहे. लग्नाच्या पार्श्वभूमीवर आधारित असा धमाल चित्रपट आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाद्वारे एक चांगला सामाजिक संदेश देण्यात आला आहे. तो चित्रपट पाहिल्यानंतरच आपल्याला समजेल.

तू आता अभिनय करायला लागली असलीस तरी तू एक प्रसिद्ध गायिका आहेस. विविध गाणी तू गायली आहेस. गायिका म्हणून तुला कमी वयातच खूप लोकप्रियता मिळाली आहे. याबाबत तुला काय वाटते...

मी एकेक गाणी गात गेले आणि प्रेक्षकांना ती आवडत गेली. सुरुवातीला काही म्युझिक अल्बम्स आणि त्यानंतर चित्रपटातील गाणी गायली. तो अनुभव एक वेगळा होता. मला असे वाटते की गाणे असो किंवा अभिनय, तुम्हाला तुमच्या कामात एकाग्रता आणि पेशन्स महत्त्वाचे असतात. प्रत्येक कामामध्ये मेहनत तितकीच असते. माझ्या गाण्यांवर प्रेक्षकांनी प्रेम केले, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे आणि आता मी नवीन इनिंग अर्थात अभिनय करायला जात आहे. त्याच्यावरही त्यांनी तितकेच प्रेम करावे, अशी माझी अपेक्षा आहे.

तुझा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे सेटवरील माहौल कसा होता?

आम्ही चाळीस दिवस भोपाळमधील चंदेरी येथे चित्रीकरण केले. रात्री माकडे खूप यायची आणि आम्हाला त्रास द्यायची. बाकीचे वातावरण छान होते. मी आतापर्यंत आई-वडिलांना सोडून इतके दिवस कधी बाहेर राहिले नव्हते. त्यामुळे थोडे अवघड गेले; परंतु सगळ्यांनी छान सहकार्य केले. धमाल-मस्तीमध्ये चित्रीकरण कधी झाले आणि संपले तेच आम्हाला समजले नाही.

कोणत्याही दिग्दर्शकाबरोबर काम करताना एखादा कलाकार त्या दिग्दर्शकाच्या शैलीचा वगैरे अभ्यास करतो. तू या चित्रपटाचे दिग्दर्शक सौरभ दासगुप्ता यांच्याबरोबर न काम करताना असा काही विचार केला होतास का...

या चित्रपटाची योगायोगाची गोष्ट म्हणजे सौरभ दासगुप्ता यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे आणि माझाही. त्यामुळे मी तसा काही विचार केलेला नव्हता. विशेष बाब म्हणजे मी कोणालाही पहिल्यांदा भेटते तेव्हा असा काही विचार करीत नाही; परंतु दिग्दर्शक म्हणून ते खूप हुशार आणि कल्पक आहेत. त्यांची आणि माझी छान मैत्री झाली आहे. त्यांचा स्वभाव गोड आहे.

अभिनय करण्याचा विचार तुझ्या मनात कसा काय आला...

अभिनयाची आवड माझ्या मनात तशी पूर्वीपासूनच होती; परंतु या दुनियेत कधी आणि केव्हा पाऊल टाकावे हे काही कळत नव्हते. कारण माझ्या मनात काहीशी भीती होती म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टी खूप मोठी आहे आणि येथे आपला निभाव लागेल की नाही, याचा विचार सातत्याने मनात येत होता; परंतु माझ्या वडिलांचा आम्हाला नेहमीच असा सल्ला होता की एखादी गोष्ट आपल्याला आवडली तर ती मिळविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे मी आता अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे.

आजकाल पाॅप आणि रॅपच्या जमान्यात शास्त्रीय संगीत काहीसे मागे पडत चाललेले आहे. तुला याबाबतीत काय वाटते..

मलादेखील असेच काहीसे वाटते आहे. मी आताही शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत आहे. गायिका अंकिता जोशी माझ्या गुरू आहेत. शास्त्रीय संगीताबाबतीत अजून जनजागृती करणे आवश्यक आहे. कारण गायनाचा तो मूळ पाया आहे आणि गायन क्षेत्रामध्ये तो पाया भक्कम असणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com