Sangharsh Yoddha मनोज जरांगे पाटील यांची भूमिका करण्यासाठी कोणती तयारी केली होती ? अभिनेता रोहन पाटील याची विशेष मुलाखत

मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध घेणारा ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट येत्या २६ तारखेला सगळीकडे प्रदर्शित होत आहे. यामध्ये अभिनेता रोहन पाटील हा मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारत आहे. त्यानिमित्त त्याच्याशी केलेली बातचीत...
rohan patil
rohan patilsakal

आपण अभिनयामध्ये करिअर करायचे, असे तुला केव्हा वाटले?

- मी नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एका छोट्याशा गावात शिक्षण घेतले. नववी-दहावीला असताना एमपीएससी-यूपीएससी परीक्षा देऊन मोठा अधिकारी व्हावे, असे माझे स्वप्न होते; परंतु मी अचानक या क्षेत्रामध्ये आलो. त्याचे असे झाले की, माझे वडील गोवर्धन दोलताडे पाटील यांनी पहिला चित्रपट काढला तेव्हा मी बारावीमध्ये होतो. त्यावेळी मी या क्षेत्रात अधिक रस दाखवला नाही. दुसरा चित्रपट ‘कन्यारत्‍न’ काढण्याचे ठरवले असता कुटुंबीयांनी मला लक्ष घालण्यास सांगितले. सगळ्यांनी आग्रह धरल्याने मी या क्षेत्राकडे वळलो. सुरुवातीला आम्हाला अपयशाला तोंड द्यावे लागले; परंतु आम्ही डगमगलो नाही. एखाद्या क्षेत्रात उडी घेतल्‍यानंतर यशस्‍वी झाल्‍याशिवाय माघार घ्‍यायची नाही, असे माझे तत्त्व आहे. कन्यारत्न, धुमस आणि मजनू हे चित्रपट मी केले. गेल्या वर्षी माझा ‘मुसंडी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सामाजिक आणि वास्तव विषयावरील चित्रपट करायला मला खूप आवडतात. आता माझा ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. मी मनोज जरांगे-पाटील यांची भूमिका साकारत आहे.

‘संघर्षयोद्धा’ चित्रपटाविषयी काय सांगशील?

- एका सर्वसामान्य कुटुंबातील एक व्यक्ती कुणाचेही पाठबळ नसताना आपल्या संघर्षाच्या जोरावर इथपर्यंत पोहोचतो, अशा व्यक्‍तीची भूमिका

साकारायला मिळतेय, याचा मला आनंद आहे. कारण मीदेखील एका सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे. माझ्या जीवनात मी खूप संघर्ष केला, आताही करतो आहे. मनोज पाटील यांनीदेखील संघर्ष केला आहे. त्यामुळे ही व्यक्तिरेखा मी उत्तमप्रकारे साकारू शकतो, याचा मला विश्वास होता.

मनोज जरांगे पाटील यांची भूमिका मिळाल्‍यानंतर मनात काय भावना होत्‍या?

- मला आनंद झाला होता. मनोज जरांगे-पाटील हा व्यक्‍ती खूप छोटा आहे; पण आपल्या विचाराने आणि कर्तृत्वाने तो मोठा झाला आहे. त्यांच्या विचारांचा माझ्या मनावर खूप मोठा प्रभाव आहे. त्यांचे विचार मला पटतात. त्यामुळे अशा व्यक्तीची भूमिका साकारायला मिळणे हे माझे भाग्यच आहे. पहिल्यांदाच मी एका बायोपिकमध्ये काम करीत आहे.

ही भूमिका साकारण्यासाठी तू काय तयारी केलीस?

- सुरुवातीला मला पंधरा ते वीस किलो वजन कमी करावे लागले. तब्बल अडीच महिने दररोज मी एकदा जेवण घ्यायचो. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना भेटलो. त्यांच्या सहवासामध्ये मी अडीच ते तीन महिने घालविले. ते कसे बोलतात, कसे चालतात... वगैरे गोष्टी मी त्यांच्याबरोबर राहून पाहिल्या. मी नगरचा असल्‍याने आमची भाषा काहीशी पुणेरी स्टाईलची आहे. ते मराठवाड्यातील असून त्‍यांच्या भाषेचा लहेजा वेगळा आहे. त्यामुळे ती भाषा मला आत्मसात करावी लागली. मनापासून आणि तळमळीने ही भूमिका साकारली आहे.

भूमिकेला न्याय मिळवून देताना दडपण होते?

मनोज जरांगे-पाटील हे व्यक्तिमत्त्व खूप मोठे आहे. अशा व्यक्तिमत्त्वावरील चित्रपटामध्ये काम करताना मनावर प्रचंड दडपण होते. कोणतेही दृश्य किंवा अन्य बाबी चुकीच्या होऊ नयेत, याची पुरेपूर काळजी दिग्दर्शक शिवाजी दोलताडे, आमच्या संपूर्ण टीमवर होती. त्‍यांच्या गेटअपमध्ये असताना मी कुठे सहसा बसायचो नाही, अनावश्यक बोलायचो नाही. सर्वांचे लक्ष माझ्याकडेच असल्‍याने मला खूप जपून वावरावे लागायचे. मी ही भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे आणि काटेकोरपणे केली आहे.

हा चित्रपट आता प्रदर्शित होणार असल्‍याने मनामध्ये भीती आहे का?

- माझ्या मनामध्ये कोणतीही भीती, चिंता नाही. उलट मोठ्या व्यक्तिमत्त्वाची भूमिका आणि त्या व्यक्तिमत्त्वावरील आधारित चित्रपट केल्याचा आनंद अधिक आहे. हा चित्रपट दोन भागांमध्ये बनविण्यात येणार आहे.

या भूमिकेने तुला काय शिकवले?

- संघर्ष केल्यानंतर माणूस मोठा होतो, हे मला या चित्रपटाचे कथानक वाचल्यानंतर समजले. सातत्य आणि चिकाटी तसेच कुठेही तडजोड न करता संघर्ष करीत राहिल्‍यास कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळते, हे मी या चित्रपटातून शिकलो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com