
हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देशभक्तीपर चित्रपट आतापर्यंत अनेक आले आहेत. त्यातील काही चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. आता स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'तेहरान' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. इस्रायल, इराण आणि भारतातील राजनैतिक घडामोडींभोवती विणलेली ही कथा आहे. सत्य घटनेवर आधारित असलेला हा चित्रपट आहे आणि एकूणच कथानक पाहता शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा असा हा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा २०१२मध्ये घडणारी आहे. या चित्रपटात डीसीपी राजीव कुमार (जॉन अब्राहम) हा या कथेचा मुख्य नायक आहे.