navras movie review
navras movie review esakal

Navras Movie Review: नवरसांमध्ये गुंफलेल्या नऊ सामाजिक कथा; 'नवरस' एक कथा कोलाज

Navras Movie Review: शृंगार रस, हास्य रस, करुण रस, वीर रस, भयानक रस असे नऊ रस घेऊन वेगवेगळ्या नऊ सामाजिक कथा या चित्रपटामध्ये गुंफण्यात आल्या आहेत.
Published on

समाजातील विविध मुद्द्य़ांवर प्रखरपणे भाष्य करणारा चित्रपट म्हणजे 'नवरस कथा कोलाज' हा चित्रपट. लेखक-अभिनेते तसेच निर्माते व दिग्दर्शक प्रवीण हिंगोनिया यांच्या या चित्रपटाने आतापर्यंत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरचे तब्बल ५८ विविध पुरस्कार पटकावलेले आहेत. या चित्रपटामध्ये मनोरंजनाबरोबरच सामाजिक विषयांना हात घालण्यात आला आहे. आपल्या संस्कृतीमध्ये नवरसांना खूप महत्त्व आहे. शृंगार रस, हास्य रस, करुण रस, वीर रस, भयानक रस असे नऊ रस घेऊन वेगवेगळ्या नऊ सामाजिक कथा या चित्रपटामध्ये गुंफण्यात आल्या आहेत.

महिलांवर होणारे अत्याचार, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, वैवाहिक नातेसंबंध आणि त्यातून होणारे वादविवाद तसेच घटस्फोट..अशा वेगवेगळ्या कथा भावनिकदृष्ट्या खिळवून ठेवणाऱ्या झाल्या आहेत. या चित्रपटाची पहिली कथा बेवारस स्थितीमध्ये सापडलेल्या एका अर्भकापासून होते. ते अर्भक एक ट्रान्सझेंडर दत्तक म्हणून घेतो. त्या मुलीला लहानाचे मोठे करतो. कोमल असे तिचे नाव ठेवतो आणि तिच्या पसंतीनुसार तिचे लग्न लावून देतो. त्याकरिता तो त्या मुलीच्या होणाऱ्या नवऱ्याला काही पैसेही देतो. परंतु तो तरुण त्या मुलीला न सांगताच दुबईला पळून जातो. या कथेमध्ये कोमलची व्यक्तिरेखा रेवती पिल्लईने सुरेख साकारली आहे.

त्यानंतर अशा एकापाठोपाठ एक गंभीर, भावुक तसेच समाजातील विविध प्रश्नांवर बेतलेल्या कथा या चित्रपटामध्ये मांडण्यात आल्या आहेत. यातील एका कथेमध्ये एका स्ट्रगलिस्ट कलाकाराची व्यथा मांडण्यात आली आहे. हल्ली गावातील तरुण-तरुणींना मुंबई शहरात येऊन हिरो किंवा हिराॅईन बनावे असे वाटत असते. परंतु येथे आल्यानंतर प्रचंड स्ट्रगल केल्यानंतरही त्यांना काम मिळत नाही. प्रत्येक वेळी त्यांची घोर निराशा होते. स्वप्न घेऊन मुंबई शहरामध्ये आलेल्या तरुणाची व्यथा नाॅट फिट द बिल या कथेमध्ये पाहायला मिळते.

शेवटची कथा ही शांत रस समोर ठेवून बांधण्यात आली आहे. ती कथा एका मुलाची आणि त्याच्या वडिलांची आहे. वडिलांना आपल्या मुलाचे प्रेम मिळत नसते. मग मुलाचे प्रेम मिळविण्यासाठी वडिलांना कसा आणि कोणता आटापिटा करावा लागतो हे या कथेमध्ये मांडण्यात आले आहे. अशा एकूण नऊ विविध सामाजिक कथा नवरसामध्ये गुंफण्यात आल्या आहेत. या चित्रपटाची कल्पना नावीन्यपूर्ण आहे आणि लेखक व दिग्दर्शक प्रवीण हिंगोनिया यांनी या कथांची मांडणी उत्तम केली आहे. या सगळ्या कथांमधून राग, द्वेष, लोभ, प्रेम, मत्सर असे विविध भाव उत्तम दर्शविण्यात आले आहेत.

navras
navras esakal

प्रवीण हिंगोनिया यांनी आपल्या समाजाला भेडसावणाऱ्या ज्वलंत प्रश्नांवर या चित्रपटाद्वारे भाष्य केले आहे. अभिनेता म्हणून त्यांनीच या चित्रपटामध्ये नऊ वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत आणि त्या सगळ्या व्यक्तिरेखा विलक्षण झाल्या आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त शिबा चढ्ढा, दयानंद शेट्टी, राजेश शर्मा, रेवती पिल्लई, अतुल श्रीवास्तव, परितोष त्रिपाठी, श्रीकांत वर्मा, शाजी चौधरी, महेश शर्मा, प्राची सिन्हा, अमरदीप झा, संजय स्वराज, जय शंकर त्रिपाठी, ईशान शंकर आणि स्वर हिंगोनिया आदी कलाकारांनी आपापल्या भूमिका उत्तम प्रकारे निभावल्या आहेत.

चित्रपटातील संगीत चित्रपटाच्या कथेला अनुसरून आहे. सिनेमॅटोग्राफर रुपम चेतियापत्र यांनी काश्मीर, दिल्ली, मुंबई वगैरे ठिकाणांची विविध लोकेशन्स आपल्या कॅमेऱ्यात सुंदर बंदिस्त केली आहेत. मात्र तांत्रिक बाबींचा विचार करता चित्रपट काहीसा कमजोर झाला आहे तसेच काही कथांमधील ठराविक दृश्ये खूप लाऊड झाली आहेत. मात्र सामाजिक नऊ कथा घेऊन त्या नवरसांमध्ये उत्तम प्रकारे गुंफण्यात आल्या आहेत. मानवी भावभावना उत्तम प्रकारे मांडण्यात आल्या आहेत.

navras movie review
मंदार देवस्थळींनी सांगितला 'आभाळमाया'चा सर्वोत्तम सीन, म्हणाले- रात्री ९ वाजता सुधीर घरी येतो आणि...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com