
सध्या सगळीकडे चर्चा आहे ती बिग बॉस मराठी सीजन 5 ची. काही वेळापूर्वीच बिग बॉस मराठी सीजन 5 चा प्रोमो शेअर करण्यात आला आणि आहे प्रोमो कमी वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झालाय. लवकरच बिग बॉस मराठी सीजन 5 प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे पण यावेळी शोचे होस्ट आहे रितेश देशमुख.
महेश मांजरेकर यावेळी बिग बॉस मराठीचं सूत्रसंचालन करणार नाहीयेत त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
सोशल मीडियावर बिग बॉसचा नवीन प्रोमो व्हायरल होताच अनेकांनी कमेंट करत रितेशचं स्वागत केलं. रितेशला होस्ट म्हणून बघण्यासाठी अनेकजण उत्सुक दिसले पण काहींनी त्यांना महेश मांजरेकरच होस्ट म्हणून हवे आहेत अशी मागणी केली. यामुळे महेश मांजरेकर यांचे फॅन्स आणि रितेशची फॅन्स यांच्यातील वादही कमेंट्समध्ये सुरु होता.
तर बिग बॉस मराठीच्या माजी स्पर्धकांनी मात्र प्रोमोवर कमेंट करत रितेशचं स्वागत केलं आणि ते महेश मांजरेकरांना मिस करतील असं म्हंटलं.
रितेश पहिल्यांदाच बिग बॉस मराठीचं सूत्रसंचालन करणार असून त्याच्या हटके स्टाईलने तो घरातील सदस्यांवर कशी नजर ठेवणार, त्यांच्यावर जरब कशी बसवणार आणि तो या शोमध्ये काय बदल करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
महेश मांजरेकर यांनी बिग बॉस मराठीचं सूत्रसंचालन सोडलं कि त्यांचा कलर्स आणि इंडेमॉलसोबतचा करार संपला म्हणून सूत्रसंचालक बदलण्यात आला या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर वाहिनीतर्फे अजून स्पष्ट करण्यात आलं नाहीये.
मागील सीजनमध्ये शो सुरु असताना महेश यांना कॅन्सरचं निदान झालं होतं त्यामुळे शो दरम्यान त्यांच्यावर उपचारही सुरु होते. त्यामुळे सिद्धार्थ जाधवने काही काळ महेश यांच्या सोबत सहसूत्रसंचालक म्हणून भूमिका निभावली. त्यामुळे महेश यांनी जर हा शो सोडला तर सिद्धार्थ जाधव सूत्रसंचालक असेल असा काहींचा अंदाज होता पण तसं घडलं नाही.
महेश यांनी शो सोडल्यानंतर सलमानप्रमाणेच स्वतःचं एक वेगळं व्यक्तिमत्त्व असलेला आणि स्पर्धकांच्या मनात त्याच्याविषयी आदर निर्माण होईल असा सूत्रसंचालक बिग बॉस मराठीला हवा होता म्हणूनच शोच्या निर्मात्यांनी रितेशची निवड केली असावी असा अंदाज आहे.
या आधी रितेशने 'विकता का उत्तर' या स्टार प्रवाहवरील शोचं सूत्रसंचालन केलं होतं. त्याच्या या शोला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता.
बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये यंदा कोणते सेलिब्रीटीज सहभागी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. या आधी अक्षय केळकर सीजन 4चं विजेतेपद जिंकलं होतं.