Parampara: रूढी-परंपरांच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्याची गोष्ट; ‘परंपरा’बद्दल भरभरुन बोलले मिलिंद शिंदे

Parampara: ‘परंपरा’ या चित्रपटात मिलिंद शिंदे (Milind Shinde) यांची मुख्य भूमिका आहे.
Parampara
Paramparaesakal

Parampara: प्रणय निशिकांत तेलंगलिखित आणि दिग्दर्शित ‘परंपरा’ (Parampara) हा चित्रपट 26 एप्रिलला प्रदर्शित झाला असून या चित्रपटाची निर्मिती हरीश कुमार आणि अँड्र्यू रिबोलो यांनी केली आहे. स्वारगेट मुव्हीज या बॅनरच्या अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. समाजात फार पूर्वीपासून काही प्रथा आणि परंपरा चालत आल्या आहेत. अशा कितीतरी प्रथा काळानुसार कालबाह्य ठरल्या असल्या तरीदेखील केवळ पूर्वजांनी सांगितल्या म्हणून त्या पाळल्या जातात. असाच एक विषय ‘परंपरा’ या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. या चित्रपटात मिलिंद शिंदे (Milind Shinde) यांची मुख्य भूमिका आहे. या निमित्ताने मनाली सागवेकरने मिलिंद शिंदे यांच्याशी केलेली बातचीत.

‘परंपरा’ चित्रपटातील तुमची भूमिका काय आहे?

- चित्रपटात माझी भूमिका रूढी-परंपरांच्या कचाट्यात सापडलेल्या एका श्रीपती नावाच्या शेतकऱ्याची आहे. कुटुंबाचे सुख आणि समाजातील परंपरा यामध्ये तो दोन्ही बाजूंनी असा गुंतून बसला आहे की, त्याला कोणत्याही एका बाजूने निर्णय घेता येत नाही. तो अशिक्षित असल्यामुळे त्याला समाजात वर्षानुवर्षे चालत आलेल्या जुन्या परंपरांच्या चौकटीत राहून त्या पुढे न्यायच्या आहेत की, काळाच्या प्रवाहात परिस्थितीचा तसेच कुटुंबाच्या भविष्याचा विचार करता त्या बदलायच्या आहेत, याचा निर्णय त्याला घेता येत नाही. या सगळ्या परिस्थितीला तोंड देत देत शेवटी तो पूर्णपणे खचून जातो.

या चित्रपटाला बरेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?

- ‘परंपरा’ हा केवळ हिरो-हिरॉईन, त्यांची प्रेमकथा आणि व्हिलन असलेला चित्रपट नाही. तर परंपरांच्या चौकटीत अडकलेल्या परिस्थितीशी झगडणाऱ्या एका मातीतल्या माणसाची कथा आहे. मला असे वाटते की, बऱ्याचदा परदेशातील प्रेक्षकांनाही प्रेमकथांपेक्षा सत्य परिस्थिती दाखवणारे सामाजिक चित्रपट पाहायला जास्त आवडतात. शिवाय आता भारतीय चित्रपटांमध्ये पूर्वीपेक्षा खूप बदल झाले आहेत. पूर्वी केवळ एक ठरलेलं समीकरण वापरून चित्रपट तयार केले जात होते; परंतु आता चित्रपटसृष्टीने समाजातील सत्य परिस्थितीवर आधारित, लोकांच्या अडचणी मांडणाऱ्या कथा प्रदर्शित करायला सुरुवात केली आहे. हीच गोष्ट कदाचित परदेशातील प्रेक्षकांना आवडली असावी. त्यामुळेच या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. याचा मला खूप आनंद आहे, अभिमान आहे. भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये असेच बदल घडले पाहिजेत. माणसाच्या जगण्यातील सत्य परिस्थिती दाखवणारे चित्रपट बनले पाहिजेत.

तुम्ही आजपर्यंत छोट्या-मोठ्या पडद्यावर बऱ्याच नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. त्यापैकी तुमची सर्वात आवडती भूमिका कोणती?

- माझी सर्वात आवडती नकारात्मक भूमिका ‘पारध’ चित्रपटातली आहे. जी राजकारणात येऊ पाहणाऱ्या एका वयस्कर कार्यकर्त्याची आहे. तो वर्षानुवर्षे एका नेत्यासोबत काम करतो, त्याच्या मागे-मागे फिरतो आणि एवढे सगळे करून इतक्या वर्षांच्या निष्ठेनंतरही त्याला काहीच मिळत नाही. न कुठले पद, न सन्मान आणि अचानक एक नवीन मुलगा येतो आणि अतिशय कमी वेळातच सगळे काही जिंकून नेतो. त्याची वाहवा केली जाते. त्या मुलाला पराभूत करण्यासाठी तो वयस्कर कार्यकर्ता कोणत्याही थराला जायला तयार असतो, अशी ती भूमिका आहे.

‘परंपरा’ चित्रपटातील भूमिका स्वीकारण्यामागचे कारण काय?

- प्रत्येक चित्रपटाच्या कथेचे आणि त्यातील पात्रांचे स्वतःचे एक वेगळेपण असते. या चित्रपटात तसेच चित्रपटात मी साकारलेल्या भूमिकेत ते मला दिसले म्हणून ही भूमिका मी स्वीकारली.

चित्रपटामध्ये काम करताना तुम्हाला आलेल्‍या अनुभवाबद्दल तुम्ही काय सांगाल?

- हा चित्रपट मी स्वीकारला तेव्हाच मला कळले होते की, या चित्रपटाचा प्रवास किती दूरपर्यंत जाणार आहे. शिवाय माझ्या इतर चित्रपटांपेक्षा ‘परंपरा’ हा चित्रपट पूर्णपणे वेगळा होता. तसेच यातील भूमिकादेखील खूप वेगळी होती. यामध्ये काम करताना मी ती भूमिका जगलो. ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशा परिस्थितीत अडकलेल्या शेतकऱ्याचे हाल आणि त्यातून बाहेर पडण्याची धडपड या सगळ्या प्रवासात खूप काही नवीन शिकवणारा अनुभव मला मिळाला आणि तो मी नेहमीच लक्षात ठेवीन.

तुम्हाला कोणत्या प्रकारच्या भूमिका साकारण्यास जास्त आवडतात?

- प्रेक्षकांच्या मनावर एक अविस्मरणीय छाप सोडून जाणाऱ्या भूमिका साकारण्यास मला जास्त आवडते. मग ती नायकाची असो वा खलनायकाची. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या झी मराठीवरील ‘तू तिथे मी’ या मालिकेत मी ‘दादासाहेब होळकर’ ही नकारात्मक भूमिका साकारली होती. सलग तीन वर्षे त्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आणि आजही लोक मला बऱ्याचदा ‘दादासाहेब होळकर’ याच नावाने ओळखतात. याचप्रमाणे मी जी भूमिका साकारतो ती एक तर महत्त्वाची असायला हवी, अथवा मी ती माझ्या प्रयत्नांनी महत्त्वाची बनवतो.

भारतीय चित्रपटसृष्टीत आजपर्यंत निळू फुले, अमरीश पुरी, अमजद खान यांसारखे कधीच न विसरता येणारे अनेक खलनायक होऊन गेले. आता यांसारखे खलनायक प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळतील का?

- कोणत्याही कलेला मर्यादा नसते. खलनायकाची भूमिका साकारणे ही एक खूप महत्त्वाची आणि अवघड कला आहे. बऱ्याचदा काही चित्रपट केवळ त्यातील खलनायकाच्या भूमिकेमुळेच प्रेक्षकांना पडद्यावर गुंतवून ठेवतात. पूर्वीच्या काळात भारतात खूपच मर्यादित माध्यमे होती. चित्रपटाची संख्या कमी प्रमाणात होती; परंतु आता तसे नाही. अनेक कलाकार अभिनयाचे शिक्षण घेऊन मुंबईत येतात. दरवर्षी हजारोंच्यावर चित्रपट बनतात आणि त्यातून तितकेच नवनवीन कलाकार, नायक-खलनायक प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. शिवाय माध्यमांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीत नेहमीच अमरिश पुरी, अमजद खान यांसारखे न विसरता येणारे खलनायक प्रेक्षकांना देत राहील.

Parampara
Chinmay Mandalekar: चिन्मय मांडलेकरने महाराजांची भूमिका सोडली तर शिवराज अष्टकाचे काय होणार? दिग्पालने थेटच सांगितले

या चित्रपटातून तुम्ही लोकांना काय संदेश देऊ इच्छिता?

- समाजातील काही परंपरांमुळे माणसाचे जगणे कठीण होऊन जाते. बऱ्याचवेळा या परंपरा जबरदस्तीने लादल्या जातात. त्‍याचा परिणाम अनेक कुटुंबांवर होतो. त्याला समाज आणि कुटुंब यामध्ये कोणाएकाची निवड करणे अवघड होते. मला असे वाटते की, लोकांनी त्यांच्या विवेकाने खऱ्या-खोट्याचा शोध लावून केवळ खऱ्याच्या बाजूने उभे राहायला हवे. शिवाय बदलत्या काळानुसार आणि परिस्थितीनुसार रोजच्या जगण्यात बदल करायला हवेत. होणाऱ्या बदलांना स्वीकारायला हवे. तसेच काही वेळा समाजाला आणि समाजाच्या परंपरेला बदलण्याची गरज असते, हे लक्षात घ्यायला हवे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com