

'जुने ते सोने’ या उक्तीचा प्रत्यय सध्या मराठी रंगभूमीवर येत आहे. काही नाट्यकलाकृती कितीही जुन्या झाल्या तरी पुनःपुन्हा बघाव्याशा वाटतात. कदाचित म्हणूनच, रंगभूमीवर या जुन्या नाट्यकलाकृतींची नव्याने नांदी होऊ घातली आहे. तेव्हाची अनेक नाटकं आज इतक्या वर्षानंतरही नाट्य रसिकांच्या आणि निर्माता-दिग्दर्शकांच्या मनावर गारुड करून आहेत. यातील काही नाटकांना पुनरुज्जीवित करण्याचे धाडस आजचे काही निर्माते करताना दिसत आहेत. ‘पुलं’च्या समर्थ लेखणीतून प्रकटलेलं ‘सुंदर मी होणार’ हे नाटक ‘पुलं’च्या स्मृतिदिनी आणि ज्येष्ठ साहित्यिका सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देखण्या नट संचात रंगमंचावर दाखल होणार आहे.