
‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा अखंड नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर... अशा भक्तिमय वातावरणात अवघी देहूनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अमृतरुपी अभंगाचे साक्षीदार होत श्री क्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज यांचे सगुण साकार रूप प्रत्यक्ष अवतरलं. निमित्त होतं… ‘अभंग तुकाराम’ चित्रपटातील कलाकारांच्या देहू भेटीचं. पावसाच्या हलक्या शिडकावातही भक्ती, श्रद्धेच्या वर्षावाने रंग भरले अन् जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा दर्शन सोहळा उपस्थितांनी याप्रसंगी ‘याची देही, याची डोळा’ अनुभवला. डोक्यावर वारकरी पगडी, कपाळावर टिळा, गळ्यात माळा आणि हातात चिपळ्या असा वेष परिधान करून ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण यांनी संत तुकाराम महाराज यांच्या भूमिकेच्या रूपातील दर्शन यावेळी दिलं. ‘अभंग तुकाराम’ चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची भूमिका साकारणार असून त्यांच्या पत्नीच्या आवलीच्या भूमिकेत अभिनेत्री स्मिता शेवाळे दिसणार आहे.