
लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं आज १० ऑगस्ट रोजी राहत्या घरी निधन झालं. गेले काही वर्ष ते कॅन्सरशी लढा देत होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला. विजय हे मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते होते. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्यांचे चित्रपट आणि नाटकं फार गाजली. अभिनयाचं त्यांना जणू बाळकडूच मिळालं होतं. विजय यांच्या पत्नीचं नाव पद्मश्री होतं. मात्र त्यांची लव्हस्टोरी अगदी हटके होती. पद्मश्री यांना मिळवण्यासाठी त्यांना आधी दोन नकार पचवायला लागले होते.
हर्षदा खानविलकर यांच्या 'नवरा असावा तर असा' या कार्यक्रमात विजय यांनी सपत्नीक हजेरी लावली होती. त्यात बोलताना पद्मश्री म्हणाल्या, 'तेव्हा खूप नाटकाचे दौरे व्हायचे. तेव्हा आम्ही बसमध्ये एकत्र जायचो. हा मला त्याची सगळी जुनी प्रकरणं सांगायचा. त्याची अफेअरपण मी डायरीत लिहून ठेवलीयेत. त्यानंतर 'टूरटूर' आलं. त्याचा सहवास वाढला. त्याने मला अचानकच प्रयोगाला जाताना भावनिक होऊन प्रपोज केलं. मी नकार दिला. म्हटलं आपण दोस्त आहोत तेच बरे आहोत. मला तेव्हा लग्न वगरे करायचं नव्हतं. त्याचा मजनू वगरे काही झाला नव्हता. थोड्या दिवसांनंतर पुन्हा त्याने मला प्रपोज केलं. आता करशील का लग्न? तरी मी त्यांना नाही सांगितलं. मला तेव्हा लग्नच करायचं नव्हतं.'
पुढे त्या म्हणाल्या, 'मग १९८६ मध्ये 'विच्छा माझी पुरी करा' आलं. तेव्हा घरून तमाशाला वगरे जाण्याची परवानगी नव्हती. हा म्हणाला, वेडी आहेस का, तमाशा वगरे नाहीये तो. तू ये बघायला. मी गेले. त्याला सांगितलं प्रयोग संपल्यावर मला घरी सोडायला यायचं. मी त्याच्या त्या कामावर इतकी खुश झाले की तेव्हा मी त्याच्या प्रेमात पडले. घरी सोडायला आल्यावर दरवाज्यातच मी त्याला लग्नासाठी प्रपोज केलं. आतून त्याला उकळ्या वगरे फुटत असतील पण आधी मी दोनदा नकार दिलेला ना. मग तो म्हणाला, विचार करून सांगतो. मग आम्ही ३१ डिसेंबरला एका फार्महाउसवर गेलेलो सगळ्या घरच्यांसोबत.
पद्मश्री पुढे म्हणाल्या, 'तेव्हा हा मला म्हणाला, चला आता पुढची सगळी वर्ष आपली. मला घरातल्यांनी सांगितलेलं की १९८६ मध्ये लग्नाचा योग नाहीये. म्हणून मी थांबलो. त्यानंतर आम्ही लग्न केलं आणि पुढे सगळं सुरळीत झालं.' विजय कदम यांची नाटकांसोबतच 'हळद रुसली कुंकू हसलं' मधली भूमिका देखील प्रेक्षकांमध्ये प्रचंड गाजली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.