
मराठी जनमानसासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची 'ज्ञानेश्वरी' आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांची 'अभंग गाथा' यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. माऊलींच्या ज्ञानेश्वरीने महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाचा पाया रचला, तर जगद्गुरूंच्या अभंगांनी त्यावर कळस चढवला. तुकोबांच्या या अभंग गाथेने तत्कालीन समाजव्यवस्थेचा विरोध झेलत आजही आपले महत्त्व टिकवून ठेवले आहे. आजही मराठी लोकांच्या बोलण्यात या गाथेतील अभंग, म्हणी आणि वाक्प्रचार नेहमीच ऐकायला मिळतात. सुमारे ३५० वर्षांनंतरही संत तुकाराम आपल्या अजरामर रचनांमधून रोजच्या जगण्यात आपल्यासोबत आहेत.