

1956 Indian cinema
esakal
बोलपटाचं हे रौप्यमहोत्सवी वर्ष होतं १९५६. पडद्यावर संगीत, प्रणय चित्रपटांची गर्दी उसळली होती. देव आनंद, गुरुदत्त आणि ओ. पी. नय्यर लोकप्रियतेचा खजिना घेऊन आले होते. निष्कलंक सौंदर्य, नृत्यकुशलता, अभिनय याची परिभाषा जिने लिहिली ती वहिदा रेहमान ‘सी.आय.डी.’मधून पहिल्यांदाच झलक दाखवीत होती. राज-नर्गिस ‘चोरी चोरी’मधून तरुणांची हृदयचोरी करीत होते... ‘ये रात भीगी भीगी''ने पुरते चिंब केले होते...
पडद्यावर हलणारी चित्रं बोलू लागली. चित्रपट, मूकपट आता बोलपट झाले, ही विसाव्या शतकातील विज्ञान, तंत्र याची घटना भलेही असेल. भारतात मात्र गोष्टी ऐकायच्या, सांगायच्या, प्रत्येक दिवसाला, ऋतुला गाण्यांनी सजवायचं, नृत्यं करायची या परंपरेला पडद्यानं उजळून टाकलं. आता हा बोलका सिनेमाच एक उत्सव झाला होता. त्यालाही आता पंचवीस वर्षे होऊन गेली होती...
कथानक शोधण्यासाठी भारतातले, परदेशातील फुटपाथ, दुकानातून पुस्तकं शोधायचा छंद असणाऱ्या गुरुदत्तना नवे सिनेमे, चेहरेही शोधायची, प्रवास करायचं, लोकांना भेटायचं अशी ओढ असे. हैदराबादच्या मुक्कामात ‘रोजलु मलाई’ या तेलुगू चित्रपटात एका मुलीचं नृत्य हे गर्दी खेचत आहे, असं कळल्यावर त्यांनी चित्रपट पाहिला आणि त्या मुलीला निरोप पाठवला. मद्रासजवळच्या एका गावात परंपरावादी मुस्लीम कुटुंबात जन्मलेल्या मुलीचं नाव होतं वहिदा रेहमान. गुरुदत्तनी मुंबईत येण्याचं आमंत्रण दिलं. वहिदा १९५५च्या जूनमध्ये मुंबईत दाखल झाली. तीन वर्षांचा करार झाला. दिग्दर्शनाची सूत्र गुरुदत्त यांनी आपला सहकारी राज खोसला यांच्या हाती दिली. चित्रपट सुरू झाला.. ‘सी.आय.डी.’ पुण्यात मैत्र जुळलं तो देव आनंद नायक ठरला. संगीत परम मित्र ओ. पी. नय्यर! इन्स्पेक्टर शेखरसाठी चित्रपटात गाण्याची जागा नव्हती; पण मित्र देव आनंद एक तरी गाणं मला हवंच म्हणून हटून बसले... मग दिग्दर्शकानं गाण्याची सोय केली... ‘ऑँखो ही ऑँखों मे इशारा हो गया...’मध्ये एक ओळ इन्स्पेक्टर शेखरना मिळालीच आणि रफींनी ती सार्थ ठरवली.