

Global Energy Transition
esakal
ऊर्जासंक्रमण नेहमी संथगतीने होते. केवळ नवीन ऊर्जास्रोत उपलब्ध झाले, म्हणून जुने स्रोत पूर्णपणे बंद होत नाहीत. आपण ज्या ‘तेलयुगा’तून बाहेर पडू पाहात आहोत, त्याचा वस्तुनिष्ठ अभ्यास आणि आकलन त्यामुळेच आवश्यक आहे. तेलाधारित भू-राजकारण समजून घेतल्यास अनेक जागतिक घडामोडींचा अर्थ उलगडण्यास मदत होते.
एक शतकाहून अधिक काळ ज्या संसाधनाने मानवी प्रगतीला ऊर्जा दिली, ते कच्चे तेल आज एका निर्णायक वळणावर उभे आहे. आधुनिक जगाच्या जडणघडणीमागील हा भक्कम आधार आता नजीकच्या भविष्यात निरोप घेण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. जागतिक हवामान परिषदांमधून आता ‘नेट-झिरो’ची, म्हणजेच, कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याची उद्दिष्टे निश्चित केली जात आहेत. जगभरातील सरकारे स्वच्छ ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी पावले उचलत असून सौरऊर्जा, पवनऊर्जा, हायड्रोजन आणि बॅटरी तंत्रज्ञान यांसारखे पर्याय अभूतपूर्व वेगाने विस्तारत आहेत.
परंतु, भविष्याकडे झेपावण्याच्या या घाईत, कदाचित आपण एक पायाभूत गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहोत, ज्याशिवाय हे ऊर्जासंक्रमण यशस्वी करणे कठीण ठरू शकते. तो पाया म्हणजे, आपण ज्या ‘तेलयुगा’तून बाहेर पडत आहोत, त्याचे आकलन होय. कच्च्या तेलाने आधुनिक जगाची संरचना निश्चित केली. जागतिक राजकारण, अर्थव्यवस्था, उद्योग, वाहतूक व्यवस्था, जीवनशैली हे सर्व काही कच्च्या तेलाच्या ऊर्जेवर उभे राहिले. तेलयुगाचा अभ्यास करणे हा नॉस्टेल्जिया नसून; ती भविष्यासाठी आखलेली आवश्यक व्यूहरचना आहे. मोठ्या तांत्रिक उलथापालथीच्या क्षणी, भूतकाळ कधीही कालबाह्य ठरत नाही. उलट, तो भविष्याचा मार्ग सुकर करणारा एक दिशादर्शक आराखडा ठरतो.