
संगीता अरबुने यांच्या सर्व लेखांमध्ये त्यांनी आपल्या सुरुवातीच्या आयुष्याचा पट उभा केला आहे. त्यात प्रेम आहे, वियोग आहे, पोरकेपणा आहे, वेदना आहे, सोसणं आहे; पण तक्रार मात्र कुठेच नाही. सहज संवाद साधणारी पारदर्शकता हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे.
‘Memory is the diary that we all carry about with us’ असं ऑस्कर वाईल्डने म्हटलं आहे... आपल्या आठवणी आपल्या जडणघडणीचा दस्तऐवज असतो. त्यांच्या खुणा आपल्या संपूर्ण अस्तित्वावरच कोरल्या गेलेल्या असतात. आपण मागे वळून भूतकाळाकडे पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं, की आपण जे अनुभवलं ते कधी पुसलं गेलंच नव्हतं. फक्त कालपरत्वे आपल्या जाणिवा अधिकाधिक प्रगल्भ झाल्यानंतर त्या जगण्याचं एक घासूनपुसून लख्ख झालेलं आपलंच प्रतिबिंब आपल्यापुढे उभं आहे. अशा जगण्याचा, विचारांच्या परिपक्वतेने घेतलेला धांडोळा म्हणजे संगीता अरबुने यांचा ‘एकसोबीस हरी पत्ती लौंग आणि मी’ हा ललित लेख संग्रह.