
सोलापुरात पहिला जलसा ठरला. त्याची तयारी सुरू झाली. मात्र रियाज करण्यापूर्वी दीनानाथ मंगेशकर यांची प्रकृती चांगली नसल्याचे लक्षात आले. पण ते ठाम होते आणि गणूमामाबरोबर लतासह ते रियाज करत असताना एक वेगळेच घडले, काय घडले होते, ते सांगत आहेत स्वतः पंडितजी...
सकाळचे सहा वाजले होते. एप्रिल असूनही
वातावरण छान होते, दिवसभर तप्त, शुष्क,
झालेले वारे, रात्रीच्या कुशीत विसावून
पहाटेच्या थंडगार हवेत झुलत झुलत एक
वेगळीच, अनोखी ऊब घेऊन संचार करीत,
करीत मोगरीचा सुगंध मिरवत मिरवत,
प्राजक्तीच्या सुगंधाला आवाहन करीत
होते.
अशी उमलावी पहाट कधी तरी
प्राजक्ताने बरसाव्या सरींवर सरी
आताच अमृताची बरसून रात्र गेली
आताच अंग माझे विझवून रात्र गेली
अशा कितीतरी अमृताच्या रात्री
बरसून वाहून जातात, अंग विझवून जातात.
मोगरा मात्र बागेतच बहरतो.
आणि सुगंधी जगण्याची केवळ स्मृती देतो.
बाबा स्तब्ध होऊन, बागेत उमलणाऱ्या पुष्पगंध,
धुंदमंद, मुक्तछंद, मुग्ध चैतन्य अनुभवीत उभे होते.
शांत झाले होते.
आपल्याच विचारात गुरफटले होते. पण आनंदीही
होते. पुण्याच्या घराला बाग वगैरे काही नव्हते.
नुसते शुष्क, रूक्ष जीवन होते. इथे बागेतल्या
फुलझाडांचे सुगंधी वारे अंगाला लपेटून ते
शांततेत सामावत होते.
थोड्या वेळाने बाबांनी त्या वातावरणातून
स्वतःला मुक्त केले.
शांत झोपलेल्या दीदीच्या निरागस चेहऱ्याकडे
पाहत ते पुटपुटले.
‘‘आज जलसा, आज पोरीची खरी परीक्षा.
खातपित मजेत खेळण्याचे हे वय,
पण ही लता खेळमजा विसरून बापाचा भार
उचलण्यात, काळजी करण्यात पार मोठी
झालीय, अशक्त झालीय, काळवंडली
आहे. झोपेतही विमनस्क भासते.
आणि मी? हिचे बालपण विसरून, ही थोर
गायिका व्हावी, हिने या वयात जलसा गावा,
तो गाजवावा ही अपेक्षा करतोय.
माझ्या बालवयात मी जो रियाज केला,
संगीतासाठी जी वणवण केली त्यात माझे
बालपण, माझ्या हातातून कधी
निसटून गेले हे मला कळलेच नाही.
लताने संगीतासाठी कष्ट घेतले आणि तिचे
बालपण रियाजातच संपले, तर? कलाकाराने
या ‘तर’ चा विचारच करायचा नसतो,
बालपण, तारुण्य नष्ट झाले तरी
मी संगीत सोडणार नाही, हा ध्यास त्याने
आयुष्यभर घ्यायचा असतो.
माझी हिच्याबद्दलची महत्त्वाकांक्षा
हिचे बालपण नष्ट करतेय, पण...
पण टाकीचे घाव सोसल्याशिवाय
देवपण लाभत नसते. ’’
बाबांनी सोशीक नजरेने दीदीकडे पाहिले.
एक दीर्घ सुस्कारा त्यांच्या तोंडून न कळत
निघाला. बाबा खाली वाकले आणि त्यांनी
पुण्याहून आणलेली ती छोटी पेटी उघडली.
तिच्यातून दाढीचे सामान साबण, ब्रश, वस्तरा
तुरटी काढली, बाबांचे एक व्रत होते,
सहाला उठायचे, मग लगेच दाढी, मग स्नान,
आणि खाऱ्या बिस्किटासह चहा.
‘‘आज संध्याकाळी जलसा, उलटी दाढी केली
पाहिजे, नाहीतर संध्याकाळी खुंट
दिसू लागतील.’’ असे पुटपुटत
बाबा दाढी करायला बसले.
वाटीतल्या पाण्यात त्यांनी ब्रश भिजवला.
आणि साबणाच्या डबीत ब्रश फिरवत
त्यांनी भरपूर फेस काढला.
मग समाधानाने तो फेसाळ ब्रश,
उचलून तो हनुवटीवर फिरवणार,
तोच त्यांचा सकाळचा उत्साह, आनंद
एकाएकी मावळला. त्यांचा हात कापू
लागला, प्रयत्न करता तो थरथरू लागला.