
राज्यातील सर्व महापालिकांमध्ये प्रशासकराज आहे. अधिकाऱ्यांच्या हातामध्ये पूर्ण कारभार असताना, त्यातून भविष्याचा वेध घेणारी कामे होतील, असा अंदाज होता. मात्र, हा अंदाज फोल ठरला आहे, असे खेदाने नमूद करावे लागेल.
महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांमध्ये महापालिकांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. मार्च २०२० मध्ये कोव्हिड१९ विषाणूची जागतिक साथ सुरू झाल्यापासून एकेक करत जवळपास सर्व २७ महापालिकांमध्ये लोकनियुक्त नगरसेवकांच्या सभागृहाचे अस्तित्व संपुष्टात आले. लोकनियुक्त सदस्यांच्या सभागृहाची जागा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घेतली. प्रशासन नियुक्त होत होते, तसा सुरुवातीच्या काळात सर्वसामान्य मतदारांमध्येही उत्साह होता. साथरोग हटता हटता महाराष्ट्रातील राजकारणाच्या साथीने उबग आणावी, इतकी नीचांकी पातळी गाठण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली होती.