

Self-reliant India Swadeshi 2.0
esakal
नववर्षाच्या सुरुवातीला एखाद्या चांगल्या बदलाचा ‘संकल्प’ करण्याचा अनेकांचा मानस असतो. मग ते आपल्या जीवनशैलीतील बदल असोत किंवा छोट्या सवयींमधील बदल असोत, काही तरी नवे करण्याकडे आपला कल असतो. यंदाच्या वर्षात अधिकाधिक स्वदेशी वस्तू वापरण्याचा संकल्प केल्यास तो केवळ आपल्या पुरताच मर्यादित न राहता त्याचा फायदा समाजातील अनेक घटकांना मिळेल आणि देशाच्या आर्थिक प्रगतीस सहाय्यक ठरेल.
शातील १९९१ च्या जागतिक उदारीकरणाच्या आर्थिक धोरणानंतर आता परत ‘स्वदेशी’चा संकल्प म्हणजे अनेकांना हा ‘ग्लोबल टू लोकल’ असा उलटा प्रवास आहे असे वाटेल; पण सध्याच्या भारत-अमेरिकेतील आयातशुल्क वाद आणि एकूणच जागतिक भू-राजकीय तणाव या सर्व पार्श्वभूमीवर, आपली अर्थव्यवस्था अधिक लवचिक बनविण्यासाठी ‘व्होकल फॉर लोकल’ हा स्वदेशी २.० चा मंत्र आवश्यक आहे, असे वाटते. इतर देशांवरील अवलंबित्व कमी करून आपल्या अर्थव्यवस्थेला आत्मनिर्भर करण्याचा हा एक मोठा धोरणात्मक आर्थिक निर्णय आहे. ‘व्होकल फॉर लोकल’ या धोरणामुळे संरक्षण, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेक्स्टाईल यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये आयातीवरचे अवलंबित्व कमी होऊन निर्यातीमध्ये सुद्धा वाढ होत आहे. या बदलांमुळे ‘एमएसएमई’ क्षेत्रात २८ कोटींहून अधिक रोजगार टिकून आहेत आणि नवे रोजगार निर्माण होत आहेत. आपला स्वदेशीचा संकल्प, कोरोना महासाथीच्या काळामध्ये ज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, असे अनेक स्थानिक उत्पादक, विक्रेते, कारागीर, घरगुती व्यवसाय करणारे व्यावसायिक यांना बळ देणारा ठरेल.